समृद्धी महामार्गावर आवश्यक सुरक्षा उपाय करा, हायकोर्टात याचिका
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: August 23, 2023 02:07 PM2023-08-23T14:07:58+5:302023-08-23T14:09:03+5:30
राज्य सरकारला मागितले उत्तर
नागपूर : लागोपाठ भीषण अपघात होत असल्यामुळे मुंबई-नागपूरसमृद्धी महामार्गावर आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात यावे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने बुधवारी राज्य सरकार व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. समृद्धी महामार्ग डिसेंबर-२०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत या महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु, महामंडळाने काहीच ठोस पावले उचलली नाहीत. परिणामी, अपघाताचे सत्र सुरूच आहे. करिता, यासंदर्भात न्यायालयानेच आवश्यक आदेश जारी करावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.