लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दहाव्या वर्गाच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची सध्या विद्यार्थ्यांमध्ये लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागाची आॅनलाईनच्या बाबतीत जास्तच प्रभावी भूमिका असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अट्टाहास अडचणीचा ठरतो आहे.नागपूर जिल्हा डिजिटल जिल्हा झाल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी, आजही अनेक गावात साधी मोबाईलची कनेक्टीव्हीटी नाही. त्यातच जि.प.च्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. त्यातच अर्ज भरतानाही काहीअडचणीच्या तरतुदी टाकण्यात आल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रवेश अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. १६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरायचे आहे तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. शिक्षण विभाग सध्या आॅनलाईन कामामुळे चांगलाच चर्चेत आहे. अख्ख्या राज्यभर आॅनलाईनच्या विरोधात शिक्षक उभे ठाकले आहेत. जि.प.च्या शिक्षकांनी एकत्र येऊन आॅनलाईनच्या कामावर बहिष्कारच टाकला आहे. अशात दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशाचे अर्ज भरायचे आहे, तेही आॅनलाईन. आॅनलाईन अर्ज भरताना काही अतिरिक्त माहिती त्यात भरायची आहे. अर्जामध्ये विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. विद्यार्थ्यांच्या जन्मस्थळाची नोंदसुद्धा करायची आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात इंटरनेट सुविधांचा अभाव आहे. शिक्षण विभागाच्या मते, १०० टक्के शाळा या डिजिटल झाल्या आहेत. परंतु त्या निव्वळ कागदावरच आहेत. अनेक शाळांमध्ये संगणक आहेत, मात्र इंटरनेटची कनेक्टीव्हीटी नाही. शिक्षकांना आॅनलाईनची कामे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करावे लागते. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी दरवर्षी दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट होतात. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत आॅनलाईनचा अट्टाहास धरला तरी पुरेशा यंत्रणा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या नाही. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी शाळांची आहे. त्यामुळे शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाºयांना विद्यार्थ्यांची सर्व माहिती गोळा करून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंटरनेट कॅफेमध्ये तासन्तास बसावे लागत आहे. अशातच गेल्या १५ दिवसांपासून शिक्षकांनी आॅनलाईन कामांवर बहिष्कार घातल्याने, त्यात आणखी गोची झाली आहे. यंत्रणा उपलब्ध करावीमाझी शाळा रामटेक तालुक्यातील करवाई येथे आहे. करवाईबरोबर लोदा, दुलारा मानेगाव या ठिकाणी साधी मोबाईलची कनेक्टीव्हीटी नाही. अशात शिक्षण विभागाने आॅनलाईन कामाचा अट्टाहास धरला आहे. आम्हाला विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून तालुक्याच्या ठिकाणी इंटरनेट कॅफेवर तासन्तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. काळाबरोबर आॅनलाईनकडे होत असलेली वाटचाल चुकीची नाही, परंतु यंत्रणाच उपलब्ध नसल्याने आॅनलाईन काम कसे करणार?.- सिद्धार्थ ओंकार, शिक्षकआॅनलाईनच्या नावावर उंदीर-मांजरासारखे प्रयोग सुरू आहेआॅनलाईनची जबाबदारी शिक्षणाधिकाºयापासून शिक्षणमंत्र्यांपर्यंत असताना केवळ शिक्षकांना वेठीस धरणे सुरू आहे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे काम सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. सुविधा उपलब्ध करून न देता काम करण्याची सक्ती करणे आणि उंदीरा-मांजरासारखे प्रयोग सध्या विभागात सुरू आहे. यामुळे शाळेची गुणवत्ता वाढली नाही, उलट शिक्षकांचा मनस्ताप वाढला आहे.- बाळा आगलावे, सचिव, राष्ट्रवादी शिक्षक संघविद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरणे मुख्याध्यापकांची जबाबदारीगेल्या दोन वर्षापासून दहावीचे परीक्षा प्रवेश अर्ज आॅनलाईन स्वीकारण्यात येतात. ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची असते. शिक्षकांनी आॅनलाईनच्या कामावर बहिष्कार टाकला असो की इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसो, मुख्याध्यापकांना प्रवेश अर्ज काहीही करून भरावयाचे आहेत. काही अन्य कारणांमुळे जर विलंब होत असेल तर बोर्डाकडे मुदतवाढ मागवून घेता येईल. पण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊ.- श्रीराम चव्हाण, सचिव, नागपूर बोर्ड
आॅनलाईन घेतेय विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:34 AM
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या दहाव्या वर्गाच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची सध्या विद्यार्थ्यांमध्ये लगबग सुरू आहे.
ठळक मुद्देकनेक्टीव्हीटीच नाही अर्ज भरणार कसा ?: शिक्षकांकडून कामावर बहिष्कार