लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने वारंवार होणाऱ्या ग्रामसभांना चाप लावत २६ जानेवारीव्यतिरिक्त राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षातून केवळ चार ग्रामसभा होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे.ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षातून चारवेळा ग्रामसभा घेणे अपेक्षित आहे. मात्र राज्य शासनाच्या इतर प्रशासकीय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनांचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून विशेष ग्रामसभा घेण्याबाबतचे निर्देश आयत्या वेळी किंवा अल्प कालावधीत जिल्हा परिषदांना देण्यात येतात. त्यामुळे अशा अचानक होणाऱ्या ग्रामसभांमुळे वर्षभरातील ग्रामसभांची सरासरी संख्या वाढत जाते. सतत ग्रामसभा घेतल्याने ग्रामस्थांचा त्यांना अल्प प्रतिसाद मिळतो व त्यांच्या आयोजनाचा हेतूही साध्य होत नाही. तसेच ग्रामसभेतील विषयावर सुयोग्य चर्चा न होता काही विपरीत घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आता ग्रामविकास विभागाने नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वित्तीय वर्षातील चारपैकी पहिली ग्रामसभा ही वित्तीय वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच झाली पाहिजे आणि दुसरी सभा दरवर्षी नोव्हेंबरमध्येच घ्यावी लागेल. याशिवाय आॅगस्टमध्ये एक आणि २६ जानेवारी रोजी दुसरी अशा ग्रामसभा घ्याव्यात. शासनाच्या ज्या विभागांना ग्रामसभेत योजनांची माहिती द्यावयाची आहे, त्या दिवशी त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आगाऊ सूचना कळवावी लागणार आहे. या चारव्यतिरिक्त एखादी ग्रामसभा कोणत्याही शासकीय विभागास आयोजित करण्याची असेल तर, त्यासाठी ग्रामविकास विभागाकडे तसा प्रस्ताव द्यावा लागणार आहे. दरम्यान, ग्रामसभा या राष्ट्रीय सणाच्या दिवशी घेण्यात येत होत्या. या ग्रामसभेत गावातील गट-तट एकमेकांची उणी-दुणी काढत होती. त्यामुळे या ग्रामसभा प्रत्येक वेळी वादळी होत होत्या. काही वेळा तर ग्रामसभेमध्ये मारामारी व वादावादीचे प्रकार घडत असल्याने, काही ठिकाणी तर पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे या ग्रामसभा म्हणजे गावच्या राजकीय आखाडाच बनल्या होत्या. परंतु याचा ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याने, या सभा राष्ट्रीय सणाच्या दिवशी न घेण्याची मागणी राज्य ग्रामसेवक युनियनने राज्य शासनाकडे केली होती, ती मागणी शासनाने मान्य केली.प्रबोधनासाठी ग्रामविकासची परवानगीग्रामविकास विभागाने काढलेल्या जीआरमध्ये २६ जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तारखेला नियमित ग्रामसभा आयोजित करण्यात येणार नाही. मात्र अशा तारखेला ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्य शासनाचे काही संदेश किंवा प्रबोधन द्यायचे असल्यास, अशा संदेशाचे वाचन व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र असे संदेश ग्रामसभेमार्फत द्यायचे असल्यास संबंधित इतर प्रशासकीय विभागांनी ते ग्रामविकास विभागाकडे पाठवायचे आहेत. त्यानंतर ग्रामविकास विभागाकडून तशा सूचना जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहेत.