नागपूर शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:10 PM2018-07-14T21:10:15+5:302018-07-14T21:11:14+5:30
शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रलंबित आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. पक्षाला शहरात बळकट करण्यासाठी संघटानात्मक निवडणूक त्वरित घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री अनीस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार अशोक धवड यांनी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक प्रलंबित आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. पक्षाला शहरात बळकट करण्यासाठी संघटानात्मक निवडणूक त्वरित घ्यावी, अशी मागणी माजी मंत्री अनीस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार अशोक धवड यांनी अ.भा. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे केली.
संबंधित नेत्यांनी मुंबई येथे खरगे यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी तिन्ही नेत्यांनी नागपूरसह विदर्भातील एकूणच राजकीय परिस्थितीचा आढावा खरगे यांच्या समक्ष सादर केला. सोबतच पक्ष बळकट करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत उपायही सूचविले. खरगे यांनी म्हणणे ऐकूण घेत आवश्यक सूचनांचा अंतर्भाव करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी विकास ठाकरे कायम असल्याचे नुकतेच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात ठाकरे यांनी समर्थकांसह खरगे यांची दिल्ली येथे भेटही घेतली होती. त्या पाठोपाठ आता संबंधित तिन्ही नेत्यांनी खरेग यांची भेट घेत शहर काँग्रेसचा मुद्दा मांडला. यावरून पक्षांतर्गत गटबाजी अद्याप क्षमलेली नसल्याचे स्पष्ट होते.