आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांची फेरचाचणी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:32 PM2018-08-20T18:32:39+5:302018-08-20T18:34:14+5:30

कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमधून नियमित आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांची १५ दिवसांमध्ये फेरचाचणी घेण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला दिला. या लॅबमध्ये नियमित चाचणीदरम्यान ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप होता.

Take recourse of Ayurvedic students | आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांची फेरचाचणी घ्या

आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांची फेरचाचणी घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : आयुर्वेद संस्थेला १५ दिवसांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमधून नियमित आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांची १५ दिवसांमध्ये फेरचाचणी घेण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला दिला. या लॅबमध्ये नियमित चाचणीदरम्यान ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप होता.
यासंदर्भात किशोर सोनवाणेसह एकूण १८ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर आयुर्वेद संस्था व नेक्सटेक टेक्नॉलॉजी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून चाचणीत ‘मास चिटिंग’ झाली नसल्याचा दावा केला, पण त्यांच्या स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने लॅबमधील सीसीटीव्ही फुटेज मागवले होते. परंतु, न्यायालयात पूर्ण सीसीटीव्ही फुटेज सादर करण्यात आले नाही. सीसीटीव्ही फुटेज तुकड्यांमध्ये होते. तांत्रिक कारणामुळे सीसीटीव्ही फुटेज करप्ट झाल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. आयुर्वेद संस्था व नेक्सटेकला त्याचाही फायदा झाला नाही. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थी एकमेकांसोबत चर्चा करीत असल्याचे दिसत होते. न्यायालयाने स्वत: सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर न्यायालयाने एकंदरित परिस्थिती लक्षात घेता या विद्यार्थ्यांची फेरचाचणी घेणार का अशी विचारणा आयुर्वेद संस्थेला केली होती. संस्थेने संबंधित समितीशी चर्चा केल्यानंतर फेरचाचणी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश देऊन याचिका निकाली काढली.
नियमित प्रवेश चाचणी गेल्या २४ जून रोजी झाली. परीक्षा केंद्रांमध्ये नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबचा समावेश होता. या केंद्रामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कर्तव्य बजावले नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे सोडवत असताना त्यांना कुणीच टोकत नव्हते. यासंदर्भात लगेच परीक्षा अधिकाºयांकडे तक्रार केली. त्यानंतर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, जरीपटका पोलीस व शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परंतु, कुणीच ऐकले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनुप ढोरे यांनी बाजू मांडली.
निकाल जाहीर करण्याची मुभा
नेक्सटेक लॅबमधून चाचणी देणारे विद्यार्थी वगळता अन्य विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची मुभा न्यायालयाने दिली. परंतु, नेक्सटेकमधील विद्यार्थ्यांच्या फेरचाचणीचा निकाल जाहीर होतपर्यंत आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मनाई केली.

Web Title: Take recourse of Ayurvedic students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.