लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडच्या संसर्गाचा धोका सर्वत्र वाढलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत गरोदर मातांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरोदर मातांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला प्रसिद्ध प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रागिणी मंडलिक व डॉ. सुमित बाहेती यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्ह कोविड संवाद माध्यमातून दिला.
महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. गरोदर मातांकडून बाळाला कोरोना होण्याचा धोका कमी आहे. बाळाला मातेने स्तनपान करणेही बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. स्तनपान करताना आईने मास्क लावणे आवश्यक आहे. याशिवाय सर्व नागरिकांनीही व्यवस्थित मास्क लावणे गरजेचे आहे. तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल, या पद्धतीनेच मास्क वापरा, प्रसूतीपूर्वी महिलेची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. अशावेळी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रसूतीदरम्यान आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते, अशी माहिती मंडलिक व बाहेती यांनी दिली.