आनंद डेकाटे नागपूर : महाकारुणिक तथागत गाैतम बुद्ध यांच्या २,५८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संघटना, सेवाभावी संस्थांतर्फे शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुठे शांतिमार्च निघाला. तर कुठे बुद्ध पहाटचे आयोजन करण्यात आले.
शहरातील विविध वस्त्यांमधील बुद्ध विहारात सकाळीच बुद्ध वंदना झाली. बौद्ध अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून विहारात आले होते. वंदना झाल्यानंतर खीर, प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील एकूणच वातावरण बुद्धमय झाले होते.संविधान चौक, दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध यांना वंदन करण्यात अनुयायांची रेलचेल होती. शहरातील अनेक भागात पंचशील पताका लावण्यात लावण्यात आला होता. बौद्ध उपासकांनी एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणी आंबेडकर व बुद्ध गीतांचे सूर निनादत होते.
लहान, वृद्ध, महिला सर्वच जण पांढरे शुभ्र वस्त धारण करून होते. जागोजागी डॉ.आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा ठेवून कार्यक्रम घेण्यात आले, रॅली काढण्यात आली. दीक्षाभूमीवर उपासकांची गर्दी होती. सकाळी व सायंकाळच्या सुमारास ती अधिक जाणवत होती. पांढरे शुभ्र वस्त्र, पंचशील ध्वज उपासकांच्या होतात होते. वस्त्यांमध्ये सामूहिक भोजन, भीमगीतांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी मिठाई वाटून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी केकही कापून जयंती साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव दिसून आला. फेसबुक, व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्राम, ट्वीटर आदी सोशल मीडियावर तथागत बुद्धांचे छायाचित्र, त्यांचे विचार, तत्वज्ञान, संदेश पाठवून त्यांना स्मरण करण्यात आले.