अविनाश पांडे यांचा इशारा : गटबाजीवर व्यक्त केली चिंता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात काँग्रेसमधील गटबाजी पाहून दु:ख होते. नेत्यांच्या व्यवहारामुळे कार्यकर्ते दु:खी आहेत. नेत्यांनी पराभवातून धडा घ्यावा. हे चित्र कोणत्याही परिस्थितीत बदलायला हवे. काँग्रेसला शहरात मजबूत करण्यासाठी आपण कठोर निर्णय घेऊ, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नवनियुक्त महासचिव व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी दिला. अविनाश पांडे यांनी बुधवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पांडे यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. पांडे म्हणाले, आज आपण माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, विनोद गुडधे पाटील, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, शौकत कुरेशी, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे आदींच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. सविस्तर चर्चा केली. शहरातील परिस्थितीची विस्ताराने माहिती घेतली. आपण कार्यकर्त्यांच्याही संपर्कात असतो. कार्यकर्ते दु:खी आहेत. नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना असलेली आशा आता निराशेत बदलली आहे. आता नेत्यांनी पावले उचलली नाही तर कार्यकर्त्यांना घृणा वाटेल. यातून विरोध वाढेल व विरोधातून दुसरे स्वतंत्र नेतृत्व उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज काँग्रेस समोर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना काँग्रेसने पद, सत्ता व पैसा दिला त्यांनी पक्षाला हातभार लावण्याची गरज आहे. पण तसे न करता आपण घरातच संकट वाढवत असू तर त्यावरही गांभीर्याने विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. चुका मान्य कराव्या लागतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा हे काँग्रेसचे मोठे शत्रू आहेत. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांना झालेल्या चुका मान्य कराव्या लागतील. खूप परिश्रम घेऊन नव्या उमेदीने मार्ग काढावा लागेल, असा सल्लाही पांडे यांनी दिला. राजस्थानमध्ये संधी राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यांच्या संपर्कात राहून त्यांना मान सन्मान देण्याची गरज आहे. काही कार्यकर्त्यांची तर फक्त भेटीची अपेक्षा असते. त्यामुळे आपणही सर्वांच्या संपर्कात राहून सुसंवाद प्रस्थापित करू. संघटन मजबूत करू. सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करू. राजस्थानमध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करून दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपुरात कठोर निर्णय घेऊ
By admin | Published: May 11, 2017 2:27 AM