लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड असू शकतो अथवा नाही हे जाणून घेण्यासाठी सहा मिनिटे वॉक टेस्ट प्रत्येकाने करायला हवी. सहा मिनिटे किमान ६०० मीटर चालावे. चालण्यापूर्वीची ऑक्सिजन लेव्हल आणि त्यानंतरची ऑक्सिजन लेव्हल तपासावी. ती पूर्वी ९६ ते ९८ असेल आणि चालणे संपल्यानंतर पाच-सहाने खाली येत असेल तर आपल्याला कोविड असू शकतो. त्यामुळे तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रेडिओलॉजिस्ट डॉ. जितेंद्र शाहू आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ कुबडे यांनी केले. महापालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोविड संवाद' या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शनिवारी नागरिकांशी गर्भस्थ,नवजात शिशू स्वास्थ्य आणि कोविड या विषयावर संवाद साधला.कोरोना महामारीवर अद्याप कुठलीही लस आली नाही. त्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरु ठेवतानाच काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. कोरोनासोबत जगण्याची सवय करतानाच बदललेल्या जीवनपद्धतीचा अंगीकार करावा. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर या सवयी अंगवळणी पडल्या तर कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो, असे मार्गदर्शन डॉक्टरांनी केले.गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे या काळात काय महत्त्व आहे, सध्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या मास्क आणि हातमोज्यांची विल्हेवाट कशी लावायची याबाबत जितेंद्र शाहू यांनी माहिती दिली.व्हॉल्व्ह असलेला मास्क हा प्रदूषणापासून बचावासाठी वापरण्यात येणाºया मास्कमध्ये असतो. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी असा मास्क वापरू नये, असा सल्ला डॉक्टर द्वयींनी दिला.खबरदारी हाच कोरोनापासून बचावाचा उपाय असून सतत काळजी घ्या. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असे समजूनच आपली वागणूक असू द्या, असेही ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरे दिली.