नागपूर : बाजारात मागील काही दिवसांपासून नकली नोटा चलनात येत आहेत. अगदी खऱ्या नोटेप्रमाणेच हुबेहूब दिसणाऱ्या नकली नोटांमुळे सामान्य माणसांची फसवणूक होते. अशा असली-नकली नोटांमधला फरक समजणे कठीणच आहे. अशा प्रकरणात सर्वांनाच जागरूक राहणे गरजेचे आहे. तुमच्या खिशात असलेली ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी, ही चिंता तुम्हाला सतावत असेल तर यावर रिझर्व्ह बँकेने काही उपाय सांगितले आहेत. नव्या करकरीत नोटा घेताय, पण सावधान, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. थोडी शहानिशा करून नोटांची देवाणघेवाण करा.
नोटबंदीच्या आधी आणि नंतरही सरकार नकली नोटांवर प्रतिबंध आणू शकले नाही. नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळ्या पोलिसांनी गजाआड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. नोटाबंदीआधी २७ आणि नोटाबंदीनंतर २०१७ पासून आतापर्यंत जवळपास ४६ गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.
सर्वाधिक नकली नोटा पाचशेच्या
बाजारात सर्वाधिक ५०० रुपयांच्या नकली नोटा चलनात आहेत. या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. पण बारकाईने पाहिल्यास नोट नकली असल्याचे दिसून येते. नकली नोटांमध्ये अनेक त्रुटी असतात. त्या सामान्यांना सहजपणे दिसत नाहीत. या नोटा बँका स्वीकारत नाहीत. त्यामुळे सामान्यांना आर्थिक फटका बसतो.
नकली नोट कशी ओळखाल?
२०० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटा बाजारात आहेत. ५०० रुपयांची नोट लाईटच्या प्रकाशासमोर ठेवल्यास त्या ठिकाणी पुसट ५०० रुपये लिहिल्याचे दिसून येते. डोळ्यासमोर ४५ डिग्री अँगलवर ठेवल्यावर हा आकडा दिसतो. ५०० चा आकडा देवनागरीमध्ये असतो. नोटांना थोडंस मोडल्यावर सिक्युरिटी थ्रीडचा रंग हिरव्यापासून निळा झालेला दिसून येतो. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही दिसतो. ५०० रुपयांच्या खऱ्या नोटेवर भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचा फोटो आहे.
बँकांचीही फसवणूक
सध्या बँकांमध्ये कॅशिअर हातांनी नव्हे तर मशीनच्या सहाय्याने नोटा मोजतात. १०० नोटांच्या बंडलमध्ये किती नोटा नकली आहेत, याची शहानिशा तत्काळ करता येत नाही. नकली नोटांबाबत बँकांचीही फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. तक्रारीशिवाय पुढे काहीच होत नाही. बँकांमध्ये नकली नोटांची भरपाई कॅशिअरला करायची असल्यामुळे त्याचा भार त्यांच्यावर येतो. त्यावर नियंत्रण आणणे कठीण असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे मत आहे.