लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड (नागपूर) : उमरेड नजीकच्या शिवापूर तलावात मोबाईलने सेल्फी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. प्रवीण हंसराज मेश्राम (२३, चिमूर, ता. चंद्रपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण मेश्राम आणि त्याचे दोन अन्य मित्र दुचाकीने भिवापूर येथून चिमूरकडे जात होते. अशातच शिवापूर शिवारात असलेल्या तलावावरील पुलावर तिघेही थांबले. अन्य दोघे काही अंतरावर गेले असताना इकडे प्रवीण आपल्या मोबाईलने शिवापूर तलावाचे फोटो काढण्यात मग्न होता. अशातच सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला. मित्रांनी वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले. ज्या ठिकाणी प्रवीण फोटो काढत होता तो पुलावरील भाग अनेक वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. अनेकदा समस्या मांडल्यानंतर सुद्धा या समस्येवर उपाययोजना करण्यात आली नाही. निदान आतातरी ही समस्या सोडवावी, अशी मागणी केली जात आहे. प्रवीण हा स्वयंपाकाचा गॅस दुरुस्तीचे काम करीत होता, असे समजते.