लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शेतीचा फेरफार करण्यासाठी शेतीचा व्यवसाय करणाऱ्याला १० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाच स्वीकारण्याच्या तयारीत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलकामठी (ता. कळमेश्वर) येथे शुक्रवारी (दि. ५) दुपारी करण्यात आली.
नितीन प्रेमनाथ निमजे, असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर तलाठ्याचे नाव आहे. त्याची नियुक्ती तेलकामठी येथील कार्यालयात हाेती. फिर्यादी म्हसाळा (टाेली), ता. नागपूर (ग्रामीण) येथील रहिवासी असून, त्यांनी तेलगाव येथील शेतकऱ्याकडून ०.८१ हेक्टर आर शेती खरेदी केली हाेती. या शेतीचे फेरफार करण्यासाठी त्यांनी १ ऑक्टाेबर २०२० राेजी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कळमेश्वर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात अर्ज सादर केला हाेता. महसूल विभागाने या अर्जावर काय कार्यवाही केली, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नुकतीच तलाठी नितीन निमजे याची तेलकामठी तलाठी कार्यालयात भेट घेतली हाेती.
त्या भेटीत नितीन निमजे याने शेतीच्या फेरफारसाठी १० हजार रुपयाची मागणी केली हाेती. फिर्यादीने त्याला हाेकारही दर्शविला हाेता. मात्र, त्यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली हाेती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीचे पाेलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी प्रकरणाची चाैकशी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट हाेताच एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी तेलकामठी येथील तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला.
तलाठी नितीन निमजे लाच स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याविराेधात सावनेर पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पाेलीस अधीक्षकद्वय राजेश दुद्दलवार व मिलिंद ताेतरे, उपअधीक्षक नरेश पार्वे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षक सारंग मिराशी, हवालदार दिनेश शिवले, शिपाई मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, शारीक शेख, विनाेद नायगमकर यांच्या पथकाने केली.