लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी आणि विदर्भाच्या प्रश्नावरून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्याने टीका करणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख भाजपमध्ये राहणार की नाही, याबाबत ते २२ सप्टेंबरला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वीही सरकारवर टीका करीत नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.काटोल फेस्टिव्हलबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कापूस, धान व संत्रा पिकांचे नुकसान झाले असून वातावरणातील बदलामुळे या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून अनेकांनी पिकांवर ट्रॅक्टर फिरविले आहे. अशी बिकट स्थिती असतानाही अद्यापपर्यंत कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली नाही. पावसाअभावी विविध भागातील धरणात पाणी नाही. पेंचसह बहुतेक जलाशय कोरडे पडले असून सिंचनाचेच नाही तर पिण्याच्या पाण्याचेही संकट ओढवणार आहे. जलसंकटाच्या नियोजनासाठी सरकारकडून कुठलीही पावले उचलली गेली नसल्याची टीका त्यांनी केली. एकतर राज्यात पूर्णवेळ कृषिमंत्री नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडे घेऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.येत्या २२ ला काटोलमध्ये विदर्भ युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या अराजकीय मंचचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह आम आदमी पक्षाचे संजय सिंग व प्रीती मेनन हे नेतेही या संसदेत सहभागी होणार आहेत. याबाबत विचारले असताख, या संसदेतच राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार, असे त्यांनी जाहीर केले.