नरखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका नरखेड तालुक्याला बसला. आता बाधितांची संख्या कमी होत असताना कोणीही बेजबाबदारपणे वागू नये. १०० टक्के लसीकरण, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्याला गृहविलगीकरणात न ठेवता कोविड केअर सेंटर मध्येच ठेवणे. याचबरोबर म्युकरमायकोसिस या आजारावरही मात करायची आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी मिशन सुरू केले आहे.
पिंपळगाव (वखाजी), मोगरा (टोळापार), येणीकोणी, बानोर (पिठोरी), अंबाडा (देशमुख ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, सदस्य, सचिव, तलाठी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका याची सभा घेऊन म्युकरमायकोसिस या नवीन आजाराबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले. म्युकरमायकोसिस हे कोरोना विषाणूमुळे उद्भवणारे फंगल इन्फेक्शन आहे. हा अतिजलद पसरणारा बुरशीचा रोग आहे. तो मुख्यत: नाक, डोळे, मेंदू यांना बाधित करतो. त्याचा प्रसाराचा वेग ३० टक्के आहे. त्यामुळे हा रोग होऊच नये याकरिता कोणत्या उपाययोजना कराव्या यासंबंधात सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यानी केले. म्युकरमायकोसिसची लक्षणेही स्पष्ट करण्यात आली. चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे, डोक्याची एक बाजू दुखणे, नाकावर सूज येणे, नाकपुडीतून रक्तस्त्राव, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, डोळा दुखणे, एक पापणी अर्धी बंद राहणे, दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डी.जी. जाधव यांनी केले.
वरील सर्व ग्रामपंचायतींमध्ये संपन्न झालेल्या बैठकीला खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र बारई, डॉ. नितीन गायकवाड, आरोग्य सेवक सतीश मोहाडीकर आणि विविध गावांचे सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.