नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : खास लहान मुलांना मान देण्याची प्रथा म्हणून साजरा करण्यात येणारा ताना पोळा शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या उत्साहात साजरा झाला.
शहरातील शताब्दी चौकात भरविण्यात आलेल्या तान्ह्यापोळ्यात चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती. पोळ्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना घेऊन आलेले पालक तसेच बघे म्हणून आलेले नागरिक या चिमुकल्यांच्या बैलांच्या सजावटीची तसेच तब्बल तीन-चार फूट उंचीच्या बैलांची प्रशंसा करीत होते.
स्टेजवर बर्फातून साकारलेले मोठे शिवलिंग नाग आणि नंदी या पोळ्याचे आणखी एक खास आकर्षण होते. श्रीरंग महापुष्प सोसायटीमध्ये असलेल्या दक्षिणेश्वर शिव मंदिराच्या प्रांगणात भरलेला तान्हा पोळाही अनेकांचे आकर्षण ठरला. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे चिमुकल्या नंदीपासून तो मोठमोठ्या काष्ठशिल्पाचा अप्रतिम नमुना असलेले बैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. कुणी शेतकऱ्यांची, कुणी कृष्णाची, कुणी सोल्जरची, तर कोणी कोणाची वेशभूषा करून आकर्षक रित्या सजविण्यात आलेल्या आपल्या नंदीबैलाला घेऊन या तान्ह्यापोळ्यात सहभागी झाले होते. उत्कृष्ट सजावट तसेच वेशभूशेत अव्वल ठरलेल्या चिमुकल्या स्पर्धकांना सुधीर येरणे, रमेश केवटे, ध्रुवकाका पाटील, प्रमोद वाघ, प्रवीण मांढरे, संजय पवार, देवानंद शेंडे, सुरेश चाफले यांच्या हस्ते आकर्षक पुरस्कार देण्यात आले.