नागपूर : कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत नागपूर-अमरावती मार्गावर दुधाळा पुलाच्यासमोर नागपूरकडून भरधाव वेगात अमरावतीकडे जाणारा टँकर उलटला. टँकर उलटताच आग लागल्याने टँकरमध्ये अडकलेल्या चालकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदतीकरीता पोहोचलेल्या दुधाळा ग्राम पंचायतीचे उपसपंच प्रकाश गुजर व कोंढाळी ग्राम पंचायतचे सदस्य कमलेश गुप्ता यांनी दिलेल्या माहिती नुसार, टँकरमध्ये चालक व क्लिनर असे दोन लोक मदतीसाठी आवाज देत असल्याची माहिती दिली.
नागपूरकडून डिझेल भरुन डिझेल किंवा केमिकल भरून भरधाव वेगात अमरावतीकडे जाणाऱ्या टँकरने आज दुपारी 2.30 वाजता दुधाळा पुलाच्या समोर भरधाव वेगात रोड दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे टँकरचा टायर फुटला व टँकर रोड दुभाजाकावरच उलटला. चालकाच्या मदतीसाठी दुधाळा व कोंढाळी येथील तरुण धावले मात्र, टँकरने जोरदार पेट घेतला. 5 कि.मी अंतरावरून धूर व ज्वाला दिसत होत्या. कोंढाळी पोलिसांनी तात्काळ दोन्ही बाजुची वाहतूक बंद करून मदत व बचाव कार्य सुरू केले.
काटोल नगररिषद, सोलार एक्सप्लोसिव्ह, नागपूर महानगरपालिका अशा अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले. काटोलचे उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाने, उपनिरिक्षक राम ढगे, उपनिरिक्षक प्रभु ठाकरे एएसआय दिलीप इंगळे आदींनी बघ्यांची गर्दीला दूर करुन दोन तास प्रयत्न करुन आग विझविली.