लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतल्यानंतर काँग्रेसने टीकास्त्र सोडले होते. यासंदर्भात फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तन्मयने नेमकी कोणत्या निकषात लस घेतली, याची माहिती नाही. परंतु अपात्र व्यक्तींना लस देणे अयोग्यच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला होता. तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. जरी १८ वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.