कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 07:45 AM2022-02-27T07:45:00+5:302022-02-27T07:45:02+5:30

Nagpur News ‘लोकमत’ला सातत्याने ‘लाईव्ह’ माहिती पुरविणारे मूळचे नागपूरकर एरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांच्या अपार्टमेंटसमोरील सुपर मार्केटवर पहाटेच्या सुमारास हल्ले झाले. यामुळे त्या परिसरातील नागरिक अक्षरश: हादरले आहेत.

'Target' by BM-31 rocket missiles in a residential area of Kiev; Nagpurkar scientist briefly survived | कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

Next
ठळक मुद्देशेकडो भारतीयांचा जीव मुठीत ‘लोकमत’ला ‘लाईव्ह’ माहिती दिली

योगेश पांडे

नागपूर : युक्रेनची राजधानी कीव्हवर चाल करून गेलेल्या रशियन सैन्याकडून चक्क रहिवासी भागदेखील ‘टार्गेट’ करण्यात येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे स्थानिकांकडून कुठलाही धोका नसताना रशियन फौजांनी विविध वाणिज्यिक इमारतींवर ‘बीएम - ३१ रॉकेट मिसाईल्स’ डागली आहेत. ‘लोकमत’ला सातत्याने ‘लाईव्ह’ माहिती पुरविणारे मूळचे नागपूरकर एरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांच्या अपार्टमेंटसमोरील सुपर मार्केटवर पहाटेच्या सुमारास हल्ले झाले. यामुळे त्या परिसरातील नागरिक अक्षरश: हादरले असून, आता घराबाहेर पडणेदेखील त्यांच्यासाठी धोक्याचे झाले आहे.

मुनेश्वर यांनी व्हिडीओ कॉलद्वारे प्रत्यक्ष स्थिती ‘लोकमत’समोर मांडली. कीव्हमधील लव्हनोस्कायव्ह-४ या भागात ते राहतात. त्यांच्या इमारतीसमोरच नोव्हस सुपर मार्केटची २६ मजली इमारत आहे. रशियन फौजा कीव्हमध्ये शिरल्यानंतर रहिवासी भागांमध्ये हल्ले करणार नाहीत, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, पहाटेच्या सुमारास जोरदार आवाजाने सर्वच दचकले. खिडकीतून पाहिले असता सुपर मार्केटच्या १७ व १८ व्या मजल्याला रॉकेट मिसाईल्सने ‘टार्गेट’ करण्यात आले होते. माझ्या डोळ्यासमोर १० ते १२ जखमींना बाहेर काढण्यात आले. त्या इमारतीत अनेक नागरिकदेखील राहतात. घरापासून अवघ्या काही अंतरावर झालेल्या या घटनेमुळे सर्वचजण प्रचंड हादरले आहेत, अशी माहिती मुनेश्वर यांनी दिली. रशियाचे सैनिक कीव्हमधील सरकारी आस्थापनांसह मोठ्या हॉटेल्स व इमारतींवर हल्ले करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णालयातील रुग्ण बचावले

नोव्हस सुपर मार्केटच्या शेजारीच एक रुग्णालय असून, तेथे रुग्णदेखील दाखल आहेत. रशियन मिसाईल्समुळे त्या रुग्णालयाचे नुकसान झालेले नाही. स्थानिक नागरिकांची कुठलीही चूक नसताना त्यांना अशाप्रकारे लक्ष्य करणे नीतीमत्तेला धरून आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

घरदेखील सुरक्षित राहिलेले नाही

मागील दोन दिवसांपासून आम्ही घराबाहेर पडून युक्रेन सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, जागोजागी संघर्ष सुरू असल्याने ते शक्य नाही. त्यामुळे घराच्या आतच राहा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अशाप्रकारे ‘रॉकेट मिसाईल्स’च डागण्यात येत असल्याने आता घरदेखील सुरक्षित राहिलेले नाही. परंतु, सध्या कुठलाच पर्याय नाही. रेल्वेने हंगेरीच्या सीमेपर्यंत जाता येईल का? याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संघ स्वयंसेवकांचे मदतकार्य

दरम्यान, कीव्ह व खार्किव्हमध्ये अद्यापही शेकडो विद्यार्थी अडकले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या हिंदू स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांची माहिती भरून ती भारतीय दुतावासाशी संबंधित अधिकाऱ्यांनादेखील पाठविण्यात येत आहे. भारतीय दुतावासाचे अधिकारीही शक्य तेवढी मदत करत आहेत, अशी माहिती मुनेश्वर यांनी दिली.

धोक्याच्या स्थितीतही ‘ग्राऊंड रिपोर्ट‘

राजेश मुनेश्वर हे अनेक वर्षांपासून ‘लोकमत’चे वाचक आहेत. धोक्याची स्थिती असतानाही त्यांनी खाली उतरून संबंधित इमारतीसमोर जाऊन २६ सेकंदांचा व्हिडीओ काढून तेथील प्रत्यक्ष परिस्थिती सांगितली.

Web Title: 'Target' by BM-31 rocket missiles in a residential area of Kiev; Nagpurkar scientist briefly survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.