वन महोत्सव : पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याचा वनविभाग काम करीत आहे. नागपूर जिल्ह्यात येत्या सात दिवसांमध्ये १६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून विद्यार्थी, कॉलेज युवक - युवती, व सामाजिक संस्थांनी हिरीरीने भाग घेतला आहे. यातून पुढील तीन वर्षात हरित महाराष्ट्र घडवू, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्य राखीव पोलीस बल आणि वन विभागातर्फे शनिवारी वन महोत्सव - २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, आ. समीर मेघे, गिरीश गांधी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान व मुख्य वन संरक्षक संजीव गौड उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, पुढील तीन वर्षात महाराष्ट्राला हरित राज्य बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पूर्व विदर्भात आमदार अनिल सोले यांनी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातून गेल्या आठवड्यात वृक्षदिंडी काढली होती तसेच गिरीश गांधी वनराईच्या माध्यमातून मागील २५ वर्षांपासून या क्षेत्रात भरीव काम करत आहेत. घरात बालकाचा जन्म झाल्याच्या निमित्ताने एक वृक्ष लागवड करायला हवी. त्या बाळाबरोबर वृक्षाचेही संगोपन होईल. शिवाय त्या वृक्षसंगोपनाला एक भावनिक आधार राहील. परिणामी, राज्याला हरित राज्य बनविणे सहजसाध्य होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्य शासनाने निश्चित केलेले चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जनतेने जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्यावर्षी दोन कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवले होते. शिवाय यावर्षी चार कोटी आणि पुढील वर्षी २३ कोटी तसेच त्यानंतर ३३ कोटी वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धन करायचे आहे. निसर्गाने मानवाला भरभरुन दिले. त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आधुनिकीकरणासोबतच वसुंधरेच्या ३३ टक्के भागावर घनदाट जंगल निर्मितीचे लक्ष्य येत्या तीन वर्षात पूर्ण करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार वृक्षसंवर्धन ही सामाजिक चळवळ बनली पाहिजे. कोणतीही चळवळ ही सामाजिक चळवळ बनल्यास त्याची व्याप्ती वाढतेवत्याच्या यशस्वीतेची खात्री पटते. प्रत्येकाने एक एक वृक्ष संगोपनासाठी दत्तक घेतल्यास राज्य लवकरच बहरेल, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आमदार अनिल सोले, आ. समीर मेघे व गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री भगवान यांनी केले. तर उमेशचंद्र धोटेकर यांनी आभार मानले.
१६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य
By admin | Published: July 02, 2017 2:30 AM