नागपूर : जगात उपलब्ध मसाल्यांच्या तुलनेत भारतीय मसाल्यांना चव, गंध, आणि गुणवत्ता यांमुळे जगात वेगळे स्थान आहे. त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी असतानाही गेल्या वर्षी जूनपासून भारतातील मसाल्यांच्या निर्यातीत डॉलरच्या तुलनेत २३ टक्के आणि रुपयाच्या तुलनेत ३४ टक्के वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत भाववाढीवर झाला आहे. स्थानिक बाजारात काही मसाल्याच्या पदार्थांचे भाव दुपटीवर तर काहींमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मसाल्याचे दर वाढल्याने स्वयंपाकाची चव महाग झाल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे इंधनाचे दर वाढत असल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच स्वयंपाकाला चव देणाऱ्या मसाल्याचे दरही दिवसेंदिवस वाढू लागल्याने महिलांचे आर्थिक गणित बिघडू लागले असून, हे दर कमी करण्याची मागणी होत आहे. देशात विविध प्रकारचे मसाले तयार होतात. सिंगापूर, इंडोनेशिया या ठिकाणांहून मसाल्याचे पदार्थ भारतात येतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाले महागले आहेत.
कोरोना संसर्गापासून बचावासाठी जेवणात मसाले वापराचा तज्ज्ञांचा सल्ला
जगभरातील तज्ज्ञांनी रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी आणि कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी जेवणात मसाल्यांच्या वापराचा सल्ला दिला आहे. भारताएवढे शुद्ध मसाल्याचे पदार्थ अन्य देशांत तयार होत नाहीत आणि त्यांचा सुवास अनेक देशांत पसंत केला जातो. शिवाय भारतीय मसाल्यांत अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भारताची मसाल्याची निर्यात वाढत चालली आहे. मसाले आहारात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर बरीच खनिजे आणि इतर सूक्ष्म पोषक घटकदेखील मोठ्या प्रमाणात योगदान देतात.
असे वाढले दर
मसाल्याच्या पदार्थात मेथी, धने, हळद, काळी मिरी, जायपत्री, लहान व मोठी विलायची, लवंग, दालचिनी, मिरची, जिरे, हिंग, वेलची यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तोंडाची चव वाढविणाऱ्या आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्यांच्या दरांत अवघ्या काहीच महिन्यांत दुपटीने वाढ झाली आहे. १ हजार ६०० रुपये किलोने असलेल्या खसखशीचा दर ३ हजार रुपये किलोवर गेला आहे. चटणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रामपत्री, तमालपत्री यांचे दर दुपटीने वाढले आहेत. काळी मिरी प्रतिकिलो ८०० रुपयांवरून ९०० रुपये किलो, शहाजिरे ८०० वरून ९०० रुपये, लवंग व जायपत्रीमध्ये प्रतिकिलो ४०० रुपये किलो वाढ झाली आहे. यामुळे गृहउद्योग वा बचत गटांतर्फे तयार करण्यात येणाऱ्या मसाल्याच्या किमतीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
महागाई पाठ सोडेना !
गॅस, खाद्यतेलांची दरवाढ कमी होण्याची प्रतीक्षा असताना, आता मसाल्यांचेही दर वाढू लागले आहेत. दीड वर्षापासून कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहे. त्यातच घर चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या दरांत वाढ होत आहे. वाढत्या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट पूर्णत: कोलमडून जात आहे.
- समीधा गोल्हर, गृहिणी.
भारतात स्वयंपाकघरात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. स्वयंपाकाचा गॅस, इंधनासह जीवनावश्यक वस्तू आणि मसाल्याच्या पदार्थांमुळे होणारी दरवाढ ही अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. बाजारात मसाल्यांना दुप्पट किंमत मोजावी लागते. सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.
- सुधा बावणे, गृहिणी.
म्हणून वाढले मसाल्यांचे दर
कोरोनाकाळात भारतीय मसाल्यांना जगात मागणी वाढली; त्यासोबतच निर्यातीतही वाढ झाली. दरवाढीचा परिणाम देशांतर्गत स्थानिक बाजारात दिसून येत आहे. वेलची, जायपत्री, विलायची, लवंग, तेजपान, आदींसह सर्वच मसाल्याचे पदार्थ वाढले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर निश्चितच झाला आहे.
- प्रभाकर देशमुख, व्यापारी
बाजारात कोणत्या पदार्थांचे भाव केव्हा आणि किती वाढणार, हे आता किरकोळ व्यापाऱ्यांच्या हातात राहिलेले नाही. नवीन माल विक्रीसाठी बोलावतो तेव्हा भाव वाढलेलेच असतात. त्याकरिता सर्वसामान्यांची नाराजी ओढावून घेतो; पण आमचा नाइलाज आहे. महागाईने कळस गाठला आहे. आता भाव कमी होणार नाहीत.
- जयंत जैन, व्यापारी.