नागपूर : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात वाद निर्माण झाला असताना नागपूरसाठी मात्र आशादायक बातमी आली आहे. नागपुरात टाटा-एअरबसचा प्रकल्प आणण्यासंदर्भात हालचाली सुरू असून, केंद्र शासनाशीदेखील चर्चा सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे ‘एव्हिएशन’ क्षेत्रात नागपूरचे नाव जागतिक पातळीवर जाणार असून, याचा फायदा निश्चितपणे विदर्भाला होईल, असे मानले जात आहे.
टाटा समूहातर्फे २०२७ पर्यंत देशात ९० बिलीयन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याअंतर्गतच टाटा-एअरबसचा प्रकल्प राहणार आहे. नागपुरातील मिहान येथे हा प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. टाटा-एअरबसचा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये होणार आहे. यासंदर्भात उदय सामंत यांनी सरकारची भूमिका मांडली. राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्यानेच हा प्रकल्प होणार आहे. टाटाच्या ‘एव्हिएशन’ विभागातील अधिकाऱ्यांशीदेखील यासंदर्भात लवकरच विस्तृत चर्चा करण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाला लावावा लागणार जोर
वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्य सरकार महाराष्ट्रात लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी एअरबस-टाटाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेतृत्वाखालील इतर राज्य सरकारांकडूनदेखील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर येथे संरक्षण केंद्रे आहेत. बोईंग, सोलर इंडस्ट्रीज आणि ब्रह्मोस एरोस्पेस यांसारख्या कंपन्यांमुळे नागपुराची ‘एअरोस्पेस हब’ म्हणून ओळख निर्माण होते आहे. मिहानमध्ये जागेचीदेखील उपलब्धता असल्यामुळे नागपूरकडे प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
प्रकल्पासाठी नागपूरच योग्य पर्याय
- देशातील केंद्र स्थान
- मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध
- एअर इंडियाच्या एमआरओसह ‘एव्हिएशन’ क्षेत्रातील काही कंपन्या अगोदरपासूनच कार्यरत
- भारतीय वायुसेनेचे ‘मेन्टेनन्स कमांड’
- कुशल मनुष्यबळाची उपलब्धता उपलब्ध
- पायाभूत सुविधादेखील उपलब्ध
- रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाद्वारे दळणवळणाचे ‘नेटवर्क’
काय होईल फायदा
- नागपूरचे नाव संरक्षण व ‘एव्हिएशन’ क्षेत्रात जागतिक पातळीवर
- महाराष्ट्र व विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती
- मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती
- गुंतवणुकीसाठी मोठ्या कंपन्यांकडून पुढाकार
- नागपूरच्या सभोवतालच्या परिसराचा वेगाने विकास
रिफायनरीसाठीदेखील सकारात्मक संकेत, राज्य शासनाचा पुढाकार आवश्यक
नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण झाल्यानंतर नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली. यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. महाराष्ट्रातील रखडलेला वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, हा प्रकल्प केवळ किनारपट्टीवरच नव्हेतर, राज्यात कुठेही स्थापन केल्या जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पासंदर्भात राज्याकडून किंवा गुंतवणूकदारांकडून अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. वार्षिक ६० दशलक्ष टन क्षमतेचा प्रकल्प महाराष्ट्रात किंवा दक्षिणेकडील राज्यात कुठेही उभारला जाऊ शकतो. केवळ एकाच ठिकाणी प्रकल्प उभारण्याऐवजी दोन किंवा अधिक ठिकाणी त्याची उपकेंद्रे उभारण्यावरदेखील विचार सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात रिफायनरी किंवा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारायचे असेल तर राजकीय इच्छाशक्तीचीच आवश्यकता असल्याचा उद्योगक्षेत्राचा सूर आहे.