लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाटा ट्रस्टच्यावतीने आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात नागरी सुविधांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती टाटा ट्रस्टचे प्रमुख (ग्रॅण्ट मॅनेजमेंट) आशिष देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. कार्यक्रमासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.देशपांडे म्हणाले, काही नवीन प्रकल्पांची अंमलबजावणी तर काही जुन्या प्रकल्पांचा विस्तार करण्यात येत आहे. ‘डेल्टा’ हा डाटा कलेक्शन, मूल्यांकन, लर्निंग, तंत्रज्ञान आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम आहे. यामध्ये जिल्हा प्रशासन, स्थानिक एनजीओ व युवकांचा सहभाग आहे. पहिल्या टप्प्यात मूल, जीवती आणि पोंभूर्णा या तीन तालुक्याच्या २९० गावांमधील १ लाख ६५ हजार लोकांच्या घरगुती गरजा आणि शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या वा नाहीत, याची माहिती एनजीओच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी १०० ते २०० पॉर्इंटवर माहिती गोळा केली आहे. पुढे हा कार्यक्रम १८ तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यात लोकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम पुढे राज्यात राबविला जाऊ शकतो.याशिवाय लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अर्थात ‘पोक्सो’ २०१२ मध्ये केंद्र सरकारने अमलात आणला. सध्या या कायद्याच्या केसेस वाढत आहेत. हा कायदा चंद्रपूर जिल्ह्यात सक्षम बनविण्यासाठी टाटा ट्रस्टचा विशेष कार्यक्रम आहे. यामध्ये शिक्षक, पालक, समाज आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी मिळून काम करणार आहे. या कायद्याच्या केसेससाठी चंद्रपूरमध्ये विशेष कोर्ट स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. देशपांडे म्हणाले, चंद्रपूरचा शैक्षणिक विभाग आणि टाटा ट्रस्टच्या डिजिटल शैक्षणिक कार्यक्रमात इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी टाटा ट्रस्ट १० अद्ययावत मोबाईल बसेस देणार आहे. याशिवाय महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कुक्कुटपालन उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येणार असून त्याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे. देशपांडे म्हणाले, राज्यातील ९० टक्के बांबू चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आहे. गेल्यावर्षी चंद्रपूर येथील बांबू रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरसोबत करार केला आहे. बांबूला प्रमोट करून जिल्ह्यात सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक तयार करण्यात येणार आहे.
नागरी सुविधांसाठी टाटा ट्रस्टचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:28 AM
टाटा ट्रस्टच्यावतीने आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यात नागरी सुविधांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विशेष कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती ....
ठळक मुद्देराज्य सरकारचा पुढाकार