लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना घरटॅक्स संदर्भातील माहिती ‘अॅप’व्दारे मिळणार आहे. टॅक्स कसा आकारण्यात आला. यावर आक्षेप असल्यास सूचनाही अॅपवर स्वीकारल्या जातील. तसेच टॅक्स भरण्याची सुविधा राहणार आहे. ही अॅप सुविधा महापालिका लवकरच सुरू करणार असल्याची माहिती गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयोजित कर आकारणी समितीच्या बैठकीत देण्यात आली.प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि विवादित मालमत्तांकडे असलेल्या थकीत करासंदर्भात तातडीने कार्यवाही करा. ठोस निर्णय घ्या आणि मार्चपूर्वी वसुली करा, असे निर्देश कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.बैठकीत झोननिहाय शासकीय मालमत्ता, विवादित मालमत्ता आणि न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणासंदर्भात आढावा घेतला. या मालमत्तांच्या थकबाकीचा आकडा मोठा असल्याने या वसुलीवर लक्ष केंद्रित करा. यापूर्वी झोननिहाय घेतलेल्या आढावा बैठकीत ठरविल्याप्रमाणे झोन कार्यालयातून किती मालमत्तांना पेशी नोटीस गेली, किती तक्रारीवर सुनावणी झाली. त्यातून किती वसुली झाली, याबाबतचा आढावा घेण्यात आला.आठवडाभरात डिमांड पाठवाबैठकीत प्रारंभी मालमत्ताचे सर्वेक्षण करणारी कंपनी सायबरटेकच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेबाबतचा आढावा घेण्यात आला. सायबरटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २,४३,१३६ मालमत्तांची माहिती एकत्रित झाली असून १,७३,६८३ मालमत्तांना कराची डिमांड पाठविण्यात आली आहे. कर निर्धारण झालेल्या उर्वरित मालमत्तांच्या डिमांड १८ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश सभापती ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
मोबाईल ‘अॅप’द्वारे भरा टॅक्स; नागपूर मनपातर्फे लवकरच सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:13 AM
नागपूर शहरातील नागरिकांना घरटॅक्स संदर्भातील माहिती ‘अॅप’व्दारे मिळणार आहे.
ठळक मुद्देथकीत टॅक्स वसुली करण्याचे सभापतींचे निर्देश