वसीम कुरैशी
नागपूर : मिहान आणि विमानतळाच्या विकासाची अपूर्णता दर्शविणाऱ्या पैलूंमध्ये विमानतळापासून मिहानपर्यंत तयार झालेल्या टॅक्सी-वेचा समावेश आहे. या टॅक्सी-वेवरून अजूनही ‘पॉवर टॅक्सिंग’ सुरू झालेली नाही. विमानतळावरून एमआरओपर्यंत विमानांना टॅक्सी-वेवरून अन्य वाहनांच्या साहाय्याने जोडून आणावे लागते. ही पद्धत अद्ययावत सुविधा असल्यानंतरही मागासपण दर्शविते.
जवळपास आठ वर्षांपूर्वी ३.६ किमी लांबीचा टॅक्सी-वे तयार करण्यात आला. येथे एआयएमआरओनंतर अन्य एमआरओ तयार झाल्यानंतर टॅक्सी-वेचा आणखी १.४ किमीचा विस्तार करण्यात आला. या मार्गावरून विमानांना ट्रॅक्टर व अन्य वाहनांनी जोडून आणावे लागते. विमानांना टॅक्सी-वेवर चालण्याच्या प्रक्रियेला ‘पॉवर टॅक्सिंग’ म्हटले जाते. त्याकरिता टॅक्सी-वेचा ऑपरेशन परिसरात सहभाग करणे आवश्यक आहे; पण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) डीजीसीएला ऑपरेशन परिसरात सहभागी करून घेण्यासाठी अजूनही प्रस्ताव पाठविलेला नाही.
डीजीसीएकडून टोइंगसाठी परवानगी
नागरी उड्डयन महासंचालकांकडून (डीजीसीए) सकाळपासून सायंकाळपर्यंत टॅक्स-वेवरून विमानांच्या टोइंगसाठी परवानगी मिळाली आहे. सध्या टॅक्सी-वे ऑपरेशनल एरियात सहभागी झालेला नाही.
-एस.के. चटर्जी, मुख्य अभियंता, एमएडीसी
मानक व बाधा :
- टॅक्सी-वेवरून विमानाच्या पॉवर टॅक्सिंगसाठी पूर्ण संरक्षक भिंत असावी. त्यामुळे बाहेरील वाहने आणि लोकांना ये-जा करता येणार नाही.
- टॅक्सी-वेच्या संरक्षक भिंतीत शिवणगावकडे जाणाऱ्या मार्गावर आताही गेट आहे. तेथून ये-जा सुरू आहे.
- पॉवर टॅक्सिंग नसल्यामुळे विमानांना विमानतळावरून एमआरओपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षेनुसार जास्त वेळ लागतो.
- पॉवर टॅक्सिंगकरिता टॅक्सी-वेवर विशेष प्रकारच्या लाइटची आवश्यकता असते.
- ऑपरेशनल परिसर असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पेट्रोलिंग होते.
- पॉवर टॅक्सिंगची सुविधा असल्याने रात्रीसुद्धा विमान टॅक्सी-वे-वरून एमआरओमध्ये आणता येऊ शकतात.