नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात टीसी (तिकिट तपासणीस) म्हणून कार्यरत असलेल्या अल्फिया खान पठाण हिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये राैप्य पदक पटकावले आहे. कझाकस्तानमध्ये एशियन बॉक्सिंग कॉन्फेडरेशन (एएसबीसी) तर्फे आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. त्यात मध्य रेल्वेकडून अल्फिया सहभागी झाली होती. यापूर्वीही अल्फियाने ठिकठिकाणी बॉक्सिंग स्पर्धा गाजविल्या आहेत. २०२३ मध्ये तिने बिलासपूर, छत्तीसगड येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय पुरुष आणि महिला आंतर रेल्वे बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी २०२२ मध्ये तिने एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवले होते.
२०२१ मध्ये तिने युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून 'जगातील सर्वोत्कृष्ट बॉक्सर' म्हणून खिताब मिळवला होता. ते, २०१९ मध्ये तिने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. लहानपणापासूनच अल्फिया बॉक्सिंगमध्ये नाव कमवित आहे. आतापर्यंत आपली चमकदार कामगिरी प्रदर्शीत करून अल्फियाने १९ सुवर्ण पदके, २ रौप्य पदके आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे.