सुमेध वाघमारे
नागपूर : तुमची मुलगी शाळेतून पहिली आली, असे सांगताच त्यांच्या तोंडून शब्दच निघाले नाहीत. ते भावुक झाले. डोळ्यातले पाणी लपवत, कातरत्या आवाजात म्हणाले, श्रमाचे फळ मिळाले. विजय भुडे त्या वडिलांचे नाव. रामदासपेठ लोकमत चौकात हातठेला लावून चहा विकतात. त्यांची मुलगी प्राजक्ता भुडे हिने घराच्या जेमतेम स्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण घेतले.
प्रयत्न केल्याने काहीही होऊ शकते हे पुन्हा सिद्ध झाले. परिस्थिती कशी असो, मनात आलेला विचार आणि स्वत:वर असलेला आत्मविश्वास तुम्हाला थांबवू शकत नाही. अशाच प्रकारची जिद्द प्राजक्ताने ठेवली. प्राजक्ता ही पंडित बच्छराज शाळेची विद्यार्थिनी. ती शाळेतच भेटली. आता लवकरच आमचे दिवस पालटतील हे तिचे पहिले शब्द होते. प्राजक्ता म्हणाली, आई रेखा आणि वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मनाशी निश्चय करूनच अभ्यासाला बसायची. शाळा, शिकवणी वर्गातून मिळालेल्या वेळात केवळ आणि केवळ अभ्यास करायची. उजळणीवर भर दिला आणि त्यातूनच हे यश मिळाले.
-बाबांच्या कामाची कधीच लाज वाटली नाही
प्राजक्ता म्हणाली, बाबांच्या कामाची कधीच लाज वाटली नाही, वाटला तो अभिमानच. भविष्यात उद्योजक व्हायचे आहे. माझ्या यशात आई, बाबांसोबतच छोटा भाऊ दर्शन आणि पं. बच्छराज शाळेच्या प्राचार्यांपासून ते वर्गातील शिक्षकांचा वाटा आहे, असेही ती म्हणाली.
मुलीचे स्वप्न पूर्ण करणार
प्राजक्ताचे वडील विजय भुडे म्हणाले, लहानपणी आई गेली. नववीत असताना वडील गेले. दहावीत ७८ टक्के गुण घेतले. परंतु कुटुंबाची जबाबदारी अंगावर आल्याने पुढे शिकता आले नाही. लोकमत चौकात हातठेला लावून चहा विकायला लागलो. यातून फार जास्त उत्पन्न मिळत नाही. परंतु मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी कष्ट घेणार, असेही ते म्हणाले. मुलीच्या यशात आपल्या ग्राहकांनाही सहभागी करून घेत भुडे यांनी आज मोफत चहा वाटला.