सावत्र भावांना धडा शिकवा; लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू
By कमलेश वानखेडे | Published: August 31, 2024 05:11 PM2024-08-31T17:11:43+5:302024-08-31T17:13:45+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : निवडणुकीत महायुतीला आशिर्वाद देण्याचे आवाहन
कमलेश वानखेडे
नागपूर : महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षा बंधनाला पैसे दिले, भाऊ बिजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारावर थांबणार नाही. ते दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडकी बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जावू, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहिण योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपुरात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. माझ्या बहिणींचे आहेत. त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू. करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता. तो पाळला.
या योजनेचे सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडलेले आहे. ही लोकप्रिय झालेली योजना आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना फसवी आहे, जुमला आहे. पैसे येणार नाही, वाट बघत बसा, असे विरोधक म्हणायचे. सरकार पैसे काढून घेईल त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या म्हटले. पैसे यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काळे पडले. ‘बुरी नजर वाले, तेरा मुह काला’ असा चिमटा घेत हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते, हे बँकेत महिलांच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे. विरोधक कितीही काही म्हटले तरी ही योजना सरकार बंद होऊ देणार नाही... नाही... नाही, असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकीत महायुतीच्या पाठिशी आपले आशिर्वाद ठेवा, असे आवाहनही त्यांनी लाडक्या बहिणींना केले.
सावत्र भावांना धडा शिकवा
काँग्रेस कार्यकर्ता अनिल वडपल्लीतर आडवाच पडणार आहे. योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेला आहे. हा कुणाचा आहे याची पार्श्वभूमी तपासा. उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय करणार नाही. विरोधकांची याचिका मुंबईत फेटाळली. आता पुन्हा नागपुरात कोर्टात गेले. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. या सावत्र भावांना धडा शिकवा, असे आवाहान करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर नेम साधला.
आम्ही ‘सुरिक्षत बहिण’ देणार
आम्ही सुरिक्षत बहिण देखील देणार, महिला अत्याचारातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सरकार कोर्टात करणार. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारमध्ये बसलेले भाऊ घेतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.