नागपूर : कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद आहे. विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापनाचे कार्य करीत आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या तुलनेत मराठी व हिंदी माध्यमाच्या अनुदानित शाळेत ऑनलाईन शिक्षण फार प्रभावी ठरले नाही. त्यामुळे परिस्थिती आणि वेळेनुसार काही शिक्षक स्वत:ला बदलण्यात जुटले आहे. सोबतच अभ्यासक्रमाला व्यवहारिक व ऑनलाईन शिक्षणाला आणखी मनोरंजनात्मक बनवित आहे.
त्यासाठी विद्याभारती नागपूर महानगरतर्फे एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विविध हिंदी, मराठी व इंग्रजी माध्यमाचे सरकारी व अनुदानित शाळेचे शिक्षक ग्रामीण भागातील शाळेत जाऊन शिक्षकांना प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षणांतर्गत इंग्रजी, मराठी, गणित व विज्ञान या चार विषयांवर विशेष भर देण्यात येत आहे. कारण नवीन शैक्षणिक सत्रात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून उत्तम व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल. पहिल्या दिवशी विद्याभारतीचे महामंत्री पवन कोरडे यांनी शिक्षकांना एका अॅप बद्दल माहिती दिली. न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेसनगरचे शिक्षक विलास हातबुडे यांनी वर्ग ८ ते १२ च्या विद्यार्थ्यांमध्ये श्रवण करणे, वाचन कौशल्य वाढविणे आदीवर प्रेझेंटेशन दिले. तर विद्याभारतीच्या उपाध्यक्ष डॉ. शुभ्रा रॉय यांनी कार्टून व्हीडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुल्यमापन करण्याची पद्धती शिकविली.
सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील मराठीच्या शिक्षिका डॉ. सोनाली हिंगे यांनी खेळा-खेळात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण कसे होऊ शकते, याचे सादरीकरण केले. जिल्हा परिषद स्कूल कामठीचे शिक्षक वसंत गोमासे यांनी वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची नवीन प्रणालीबाबत माहिती दिली. त्याचबरोबर संगीता काशीकर यांनी शालेय शिक्षणाला मनोरंजनात्मक बनविण्यासाठी शब्दकोडे यांचा वापर कसा करता येईल, याबद्दल प्रशिक्षण दिले. या संपूर्ण उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्याभारती संघटनेचे विदर्भ मंत्री शैलेश जशी, पश्चिम केंद्राचे सदस्य श्रीकांत देशपांडे, महानगर प्रमुख प्रकाश कापसे यांचे सहकार्य लाभले.