नागपूर : शहरात जणू काही जंगलराज सुरू आहे, अशा अविर्भावात तरुण शिक्षिकेचे महामार्गावरून अपहरण करून तिच्यावर निर्जन ठिकाणी सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच नराधम आरोपींची २० वर्षे सश्रम कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कायम ठेवली, तसेच या शिक्षेविरुद्ध आरोपींनी दाखल केलेले अपील गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले. गुन्हेगारांच्या रानटी प्रवृत्तीवर वचक बसविणारा हा निर्णय न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी दिला.
प्रकरणातील आरोपींमध्ये अश्विन अशोक दोनोडे (३५, रा. हुडकेश्वर), अनिल राजू इंगळे (४२, रा. मुंबई), रोशन ऊर्फ आशिष मधुकर इंगळे (३२, रा. नंदनवन), पुंडलिक डोमा भोयर (४१, रा. संजय गांधीनगर) व मो. अफरोज जियाउद्दीन पठाण (४५, रा. खरबी) यांचा समावेश आहे. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना संबंधित शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सहावा आरोपी सुदर्शन गजानन म्हैसकर हा ठोस पुराव्यांअभावी सत्र न्यायालयातूनच निर्दोष सुटला आहे.
शहरातील सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारी ही घटना १ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. पीडित तरुणी मित्र शैलेश शेवारेसोबत एचबी टाऊनकडे जाणाऱ्या महामार्गावर गप्पागोष्टी करीत होती. दरम्यान, रात्री ८ च्या सुमारास आरोपी तेथे गेले व पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनाही धमकावले. आरोपींनी पीडित तरुणी व तिच्या मित्राला वेगवेगळ्या मोटारसायकलवर बसवले. दोन आरोपी मुलीला घेऊन पुढे गेले. दरम्यान, शैलेशने एका आरोपीला धक्का देऊन पळ काढण्यात यश मिळविले, पण त्याने पोलिसांची मदत घेतपर्यंत बराच वेळ होऊन गेला. तेव्हापर्यंत आरोपींनी वासना पूर्ण केली होती. उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.
तरुणीने हात जोडून विनवण्या केल्या
पीडित तरुणीला आरोपी निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तेथे तिला चाकू दाखवून ठार मारण्याची व जसे सांगितले जाईल तसे करण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीने हात जोडून, जोरजोरात रडून घरी जाऊ देण्याची वारंवार विनवणी केली. परंतु, नराधम आरोपींवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी तरुणीवर एकापाठोपाठ एक बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी २२ डिसेंबर २०१४ रोजी सर्व आरोपींना अटक केली.
अशी आहे आरोपींची पूर्ण शिक्षा
सामूहिक बलात्कार : २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास.
अपहरण : १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास.
ठार मारण्याची धमकी : ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास.
लोकसेवक असल्याचे खोटे सांगणे : २ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास.
पाच दिवसात तिघांकडून दोन बलात्कार : घटनेच्या वेळी पीडित तरुणी २१ वर्षे वयाची होती. तिला आयुष्याचा जोडीदार शोधून जीवनात पुढे जायचे होते. परंतु, आरोपींनी तिचे स्वप्न उद्ध्वस्त केले. आयुष्यात अशी घटना घडेल असा विचारही तरुणीने कधी केला नसेल, असे मत न्यायालयाने आरोपींची शिक्षा कायम ठेवताना व्यक्त केले. या घटनेपूर्वी आरोपी अफरोज, अनिल व पुंडलिक यांनी इतर साथीदारांसोबत २६ नोव्हेंबर २०१४ रोजी अन्य तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळी त्यांनी ते वन कर्मचारी असल्याचे सांगितले होते. सत्र न्यायालयाने त्या प्रकरणातही या तिघांना २४ ऑगस्ट २०१७ राेजी शिक्षा सुनावली आहे.