शिक्षक दिनी काळ्या फिती लावून करणार काम : राज्यभरात होणार ‘शिक्षण हक्क’ आंदोलननागपूर : अनाकलनीय शैक्षणिक धोरण, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या नावावर शिक्षकांना वेठीस धरण्याची शासनाची भूमिका, यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या शिक्षक दिनाला शिक्षक ांच्या संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे तर महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृति समितीने शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील कायम विना अनुदानित शाळेतील ६८ हजार शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार आहे. शालेय शिक्षण मंत्र्याने शिक्षकांना कामचुकार अपशब्द उद्गारले. मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकू, अशी धमकी दिली. आपले शब्द मागे घ्यावे, यामागणीसाठी शिक्षक भारतीने ५ सप्टेंबरला शिक्षक हक्क आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात २०००-२००१ पासून कायम विना अनुदानित शाळा देणे शासनाने सुरू केले. संघटनेच्या दबावामुळे २००९ साली कायम शब्द वगळून शाळा विना अनुदानित करण्यात आल्या. राज्यातील १३४३ शाळांचे मूल्यांकन झाले मात्र अनुदान काही मिळाले नाही. काँग्रेस सरकारच्या काळात कायम शब्द वगळण्यात आला. त्यावेळी आंदोलनात जे आमच्या सोबत होते, ते आता सत्तेत आले. तरीही विना अनुदानित शाळांचे भवितव्य अंधारातच आहे. राज्यात कायम विना अनुदानित शाळेत ६८ हजार शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांचे वेतन मिळावे यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. शिक्षण मंत्री ऐकायला तयार नाही. त्यामुळे शिक्षक कंटाळले आहे. त्यामुळे येत्या ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन संघटनेचे कार्याध्यक्ष रामचंद्र बाविस्कर यांनी पत्रपरिषदेतून केले आहे. पत्रपरिषदेला शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे खेमराज कोंडे, दिलीप तडस आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Published: September 03, 2015 2:42 AM