नागपूर : विधान परिषदेच्या नागपूरशिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ३० जानेवारीला मतदान होईल. मागील निवडणुकीच्या तुलतेन यंदा जवळपास साडेचार हजारांनी मतदार संख्येत वाढ झाल्याची माहिती विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
२ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मतदान सकाळी ८ ते ४ च्या दरम्यान होईल. मागील निवडणुकीत ३५,००९ मतदार होते. यावर्षी ३९,४०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. यात २२ हजार ७०४ पुरुष, तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहिता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.
- पोस्टर, बॅनर हटणार
नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शुभारंभ व उद्घाटनाच्या कार्यक्रम करता येणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांवर प्रभाव पडेल, असे निर्णय सरकारला घेता येणार नाहीत. अधिवेशनासाठी संपूर्ण शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व विविध नेत्यांचे पोस्टर व बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व पोस्टर, बॅनर प्रशासनाकडून काढण्यात येणार आहे.
- नोटा, सुटीबाबत आयोगाकडे मागणार मार्गदर्शन
या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर होणार आहे. पदवीधर संघाच्या निवडणुकीत नोटाचा समावेश नव्हता. या निवडणुकीत नोटासंदर्भात भारत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागण्यात येईल. त्याचप्रमाणे सुटीसंदर्भातही मार्गदर्शन मागण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.
- असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज ५ जानेवापारीपासून दाखल करता येईल. १२ जानेवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. १३ ला अर्ज छाननी होणार असून, १६ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.