वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 02:17 PM2022-03-17T14:17:22+5:302022-03-17T14:56:25+5:30
आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली.
नागपूर : शिक्षक सेवकांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पात अजित पवारांनी आमदाराचा निधी चार कोटीवरून पाच कोटी रुपये केला. आमदाराच्या पीएच्या पगारात पाच हजाराची वाढ केली. एवढेच नव्हे तर ड्रायव्हरचा पगार वर्षभरात दोनदा वाढविला. पण शिक्षण सेवक सहा हजारात वेठबिगारी करतोय. सांगा महागाईच्या काळात आम्ही जगायचे कसे, असा सवाल करीत शिक्षणसेवकांनी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच ताशेरे ओढले.
२०१० नंतर तब्बल १० वर्षांनी पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्यात आली. अनेक नवनियुक्त शिक्षकांची घरापासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात नियुक्ती झाली. या नवनियुक्त शिक्षकांना तीन वर्ष सहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. पूर्वी हे मानधन केवळ तीन हजार रुपये होते. २०१२ पासून या मानधनात सहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली. आजची महागाई बघता सहा हजार रुपयात जगायचे कसे? असा सवाल शिक्षक सेवकांकडून करण्यात येत आहे.
काही जिल्ह्यात रुमचे भाडेच सहा हजार रुपये आहे. बाकीचे खर्च कसे करायचे, असाही प्रश्न शिक्षण सेवकांनी केला आहे. आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. शिक्षण सेवक व सहा.शिक्षक यांच्या कामात कुठलाही फरक नाही. अनेक शिक्षण सेवकांकडे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखाचा चार्ज आहे. कोरोनाच्या काळात ड्युटी केल्या. त्यांना कुठलेही विमा संरक्षण दिले नाही. शिक्षकांना समाजात जगताना खूप अडचणी येत आहेत, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली.
- अर्थमंत्र्यांना केले टॅग
आमदारांच्या चालकाचा पगार एक वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील २० वर्षांपासून सहा हजारावर वेठबिगारी करतोय. त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे. वा दादा मानले तुम्हाला... धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय, अशा आशयाचा मॅसेज करून शिक्षण सेवकांनी ट्विटरवर अर्थमंत्र्यांनाच टॅग केले.
आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे .
— Pramod Rajput (@PramodR76233757) March 17, 2022
वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला...
धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय#शिक्षणसेवक_मानधनवाढ
- शिक्षण सेवकांच्या संतप्त प्रतिक्रिया
शिक्षण सेवकाचे मानधन वाढवायला पैसा नाही. आमदाराचा ड्रायव्हर व पीएचा पगार वाढवायला पैसा आभाळातून पडतो का?, जरा शिक्षण सेवकाकडे लक्ष द्या, सहा हजारात जगतोय, लाज वाटू द्या. जेवढे दिवस आमदार खूश राहणार तेवढेच दिवस हे सरकार टिकणार, हे दादांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. अशा आशयाच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.