लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून शाळेत शिकवायला जाणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आल्या आहेत. शिक्षकही मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत असून, सुमारे २०० शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. शिक्षकच पॉझिटिव्ह निघत असतील तर शाळा कशा सुरू होणार, ही नवीनच गुंतागुंत प्रशासनाला भेडसावत आहे. यामुळे पालक व विद्यार्थीही धास्तावले आहेत.
दिवाळीनंतर कोरोनाची लाट पुन्हा येईल, अशी शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत होती. नंतर झालेल्या टेस्ट आणि वाढलेली पॉझिटिव्हची संख्या यावरून संकेत खरे ठरत आहेत. अशात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या अनिवार्य केल्या आहेत. १७ नोव्हेंबरपासून मोठ्या संख्येने शिक्षक टेस्ट करीत आहेत. गुरुवारपर्यंत आलेल्या टेस्टच्या अहवालावरून विदर्भात २०० च्या जवळपास शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. अजूनही ७० टक्के शिक्षकांच्या टेस्टचे अहवाल यायचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक पॉझिटिव्ह येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- विद्यार्थ्यांच्या टेस्टचे काय?
प्रशासन शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत आहेत. पण शिक्षकाच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या बरीच मोठी आहे. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग करायची आहे. केवळ थर्मल स्कॅनिंगने कोरोना डिटेक्ट होईल का, असाही सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
पालकांमध्ये धास्ती
शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घ्यावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिक्षकांची पॉझिटिव्हची संख्या वाढल्याने पालकांमध्ये धास्ती वाढली आहे. या भीतीपोटी अनेक पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यासंदर्भातील संमतिपत्र भरून दिले नसल्याची माहिती आहे.
शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर
संस्थाचालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भात नकार आहे. बहुतांश पालकसुद्धा मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रशासन साहित्य पुरवायला तयार नाही. आता शिक्षण विभागानेही हात वर केले आहे. संपूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनावर ढकलली आहे. तरीही शाळा सुरू करण्याचा अट्टहास का, असा नाराजीचा सूर शिक्षकांमधून उमटत आहे.
जिल्हानिहाय पॉझिटिव्ह शिक्षक
नागपूर ४१
वर्धा २४
गोंदिया ४३
चंद्रपूर ९
यवतमाळ १४
अकोला ६२
बुलडाणा १८
भंडारा (७०० शिक्षकांच्या चाचण्या झाल्या, दोन दिवसात अहवाल येईल, असे माध्यमिक शिक्षण अधिकारी संजय डोर्लीकर यांनी सांगितले.)