नागो गाणार यांची उमेदवारी अवैध असल्याचा दावा : बीजवार यांना बनविले उमेदवारनागपूर : नागो गाणार यांना विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र शिक्षक परिषदेत फूट पडली आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठीमध्ये परिषदेच्या नागपूर विभागाच्या बैठकीत परिषदेतर्फे वर्धा जिल्ह्याच्या शेषराव बीजवार यांना उमेदवार घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यमान आमदार नागो गाणार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिषदेच्या समर्थनामुळेच गाणारांनी मागील निवडणूक जिंकली होती.परिषदेच्या नागपूर विभागाचे पदाधिकारी संघटनेशी जुळलेल्या सदस्यांना याची माहिती देत आहेत. परिषदेच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ.उल्हास फडके व कार्यवाह सुदाम काकपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. गाणार नागपूर विभागातून उमेदवार नाहीत. संघटनेने बीजवार यांना उमेदवारी दिली आहे. ३ सप्टेंबर रोजी पुण्यात राज्य कार्यकारिणीने गाणार यांना उमेदवारी दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परिषदेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्यक्षात राज्य कार्यकारिणीच अवैध आहे. या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०१४ मध्येच संपला. त्यामुळे आता कार्यकारिणीला निवडणूक कार्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असेदेखील त्यांनी सांगितले.विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. परिषदेच्यावतीने नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यासंदर्भात नागपूर विभागीय अध्यक्षांसमवेत कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याअगोदर सर्वांनी पदाचा राजीनामादेखील दिला होता. सोबतच ३ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत गाणार यांना उमेदवारी देण्याच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचादेखील निर्णय घेतला होता. पुण्यात झालेल्या बैठकीत या निर्णयाला अमान्य करण्यात आले.(प्रतिनिधी) बीजवार यांची उमेदवारी निश्चित : फडकेविभागीय अध्यक्ष उल्हास फडके यांनी बीजवार यांना उमेदवारी मिळाल्याच्या वृत्ताला होकार दिला. सध्या ते मतदार नोंदणीच्या कामात लागले असून नवीन निर्णयाची माहिती सर्व सदस्यांना देत आहेत.यामुळे अवैध आहे गाणार यांची उमेदवारीसंघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी गाणार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीने मे महिन्यात घेतला. या निर्णयाला नागपूर विभागीय कार्यकारिणीचे असंतुष्ट पदाधिकारी व सदस्य सुरुवातीपासूनच विरोध करत होते. मे महिन्यात राज्यस्तरीय संसदीय समितीसमोर त्यांनी विरोधदेखील नोंदविला होता. राज्य कार्यकारिणीला या निर्णय घेण्याचा निर्णय नाही, असा युक्तिवाददेखील मांडला होता. असे असतानादेखील कार्यकारिणीने अवैधपणे निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात राज्य कार्यकारिणीचा कार्यकाळ जानेवारी २०१५ मध्येच संपला होता. नवी कार्यकारिणी गठित करण्यासाठी लगेच निवडणूका व्हायला हव्या होत्या. परंतु असे न करता कार्यकारिणीने निवडणुका सहा महिन्यांसाठी स्थगित केल्या. गाणारांची उमेदवारी कायम रहावी हा यामागचा उद्देश होता. सहा महिन्यांचा कालावधी जून २०१६ मध्ये संपुष्टात आला. तरीदेखील कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली नाही. परिषदेच्या संविधानानुसार निवडून आलेल्या कार्यकारिणीच्या अनुपस्थितीत प्रभारी कार्यकारिणी धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. तरीदेखील गाणार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिक्षक परिषदेत फूट
By admin | Published: September 22, 2016 2:58 AM