शिक्षक मतदार संघ: नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला, शिवसेना घेणार माघार!
By कमलेश वानखेडे | Published: January 15, 2023 11:37 PM2023-01-15T23:37:20+5:302023-01-15T23:38:53+5:30
महाविकास आघाडीच्या नेत्यांची रविवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची जागा अखेर शिवसेनेच्या जबड्यातून हिसकावून काँग्रेसच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. रविवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत नागपूरची जागा काँग्रेसला सोडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. सोमवारी दुपारी याची अधिकृत घोषणा होईल व शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल असा दावा काँग्रेस मधील सूत्रांनी केला आहे.
११ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत नागपूरची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी १२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म जोडला. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरची जागा शिवसेनेला सोडली नसल्याचे स्पष्ट करीत १५ जानेवारी रोजी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल व त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारी बैठक होणे अपेक्षित होते. मात्र काही कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यामुळे पटोले हे मुंबईला गेलेच नाही. ते दिवसभर गडचिरोली व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इकडे महाविकास आघाडीची बैठक होईल व काहीतरी तोडगा निघेल या आशेवर सर्वांच्या नजरा मुंबईकडे लागल्या होत्या. मात्र दिवसभर बैठकच न झाल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. शेवटी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख नेत्यांची बैठक होईल, असे सांगण्यात आले.
शेवटी रात्री साडे नऊच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुभाष देसाई यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेत नाना पटोले यांनी नाशिकची जागा शिवसेनेला सोडली असल्यामुळे नागपूरची जागा काँग्रेसला सोडावी असा आग्रह धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेअंती पटोली यांची मागणी मान्य करण्यात आली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. मात्र, नागपूरची जागा काँग्रेसला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. सोमवारी सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा चर्चा होईल व त्यानंतर घोषणा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस अडबाले यांना समर्थन देणार ?
- नागपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यास काँग्रेसकडून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन दिले जाण्याची जास्त शक्यता आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते नैसर्गिक युतीचा हवाला देत अडबाले यांना समर्थन देण्यासाठी आग्रही आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. मात्र काँग्रेस कडून शब्द पाळण्याची शक्यता कमीच आहे.