लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकाच्या जीवनात एखादे शिक्षक असे असतात जे विद्यार्थ्यांचे आयुष्यच बदलून टाकतात. माझ्याही जीवनात असेच एक शिक्षक आहेत. ते म्हणजे पन्नालाल सर. नवव्या वर्गात शिकत असताना पन्नालाल सर आम्हाला विज्ञान शिकवायचे. विज्ञान हा विषय आम्हाला गुंतागुंतीचा वाटायचा. परंतु ते विज्ञान अतिशय सहज व सोप्या शब्दात समजावून सांगायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. ते शिकवायला लागले की आम्ही सर्व मुलं मंत्रमुग्ध होऊन जायचो. ते ज्या सहज-सोप्या पद्धतीने शिकवायचे त्यामुळेच मला विज्ञान या विषयाची प्रचंड गोडी निर्माण झाली. पुढे मी तोच विषय घेतला. माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे, मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त केली.विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये गोडी नसते. त्यामुळे ते विषय त्यांना कठीण वाटू लागतात. असाच एक विषय विज्ञान हा आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना हा विषय आवडत नाही. परंतु आम्हाला पन्नालाल सरांसारखे शिक्षक लाभले. ते आपला विषय इतक्या लॉजिकली समजून द्यायचे की, त्यात आवड निर्माण व्हायची. त्यामुळे विद्यार्थी त्या विषयाकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचे. त्यात ते पारंगत व्हायचे. पन्नालाल सरांमुळे माझे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून गेले असे मला वाटते. त्यांनी विषयांबद्दलची जी गोडी माझ्यात निर्माण केली, तिला तोड नाही. आजच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येक विषयात गोडी निर्माण करणारे पन्नालाल सर यांच्यासारखे शिक्षक लाभावे.अन ‘रट्टा’ मारणे बंद झालेआम्ही जम्मू काश्मीरला राहात होतो. जम्मूमधील हायस्कूलला मी शिकत होतो. तेव्हाचे शिक्षण हे पाठांतर रट्टा मारणे असेच होते. आमच्याकडेही तसाच प्रकार चालायचा. आम्हीही रट्टा मारतच शिकत होतो. सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास हे सर्व विषय केवळ रट्टा मारतच शिकत होतो. परंतु त्या विषयांमध्ये फारशी गोडी काही वाटत नव्हती. चांगले गुण घेऊन पास होणे इतक्यापर्यंतच मर्यादित होते. विषय समजून घेणे हे काय असते, याची जाणीवसुद्धा नव्हती. आठव्या वर्गापर्यंत हे असेच चालत राहिले. परंतु नवव्या वर्गात आम्ही गेलो. तेव्हा पन्नालाल सर आले आणि विषयांकडे पाहण्याची व ती शिकून समजून घेण्याची आमची दृष्टीच बदलली. पन्नालाल सर विज्ञान हा विषय शिकवायचे. विज्ञान हा विषय आम्हा मुलांना तसा गुंतागुंतीचाच वाटायचा आणि होता सुद्धा. परंतु पन्नालाल सर यांची शिकवण्याची पद्धतच मुळात वेगळी होती. ते अतिशय सहज व सोप्या शब्दांमध्ये आपला विषय समजावून सांगत असत. त्यामुळे विज्ञान विषय मला अधिक आवडू लागला. मी त्या विषयात अधिक रस घेऊ लागलो. तो विषय समजून घेऊ लागलो. केवळ विज्ञान हा विषयच नाही. तर प्रत्येत विषय हा लॉजिकली समजून घेण्याची दृष्टी माझ्यात निर्माण झाली.ती आजपर्यंत कायम आहे, असे मला वाटते. आज मी एक सनदी अधिकारी म्हणून काम करतो. प्रशासनातील कामांसह शेकडो लोकं मला विविध विषय घेऊन भेटत असतात. मला अनेक विषय हाताळावे लागतात. ते समजून घेताना मला पन्नालाल सरांनी शिकवलेली पद्धत कामी येते. मी प्रत्येक विषय लॉजिकली समजून घेतो. त्याचा मला प्रशासकीय कामातही फायदाच होत आहे. त्यामुळे माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे महत्त्व कितीतरी अधिक आहे.
शिक्षक दिन विशेष; ...आणि मला विज्ञान विषयाची गोडी निर्माण झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 10:45 AM
माझ्या जीवनात पन्नालाल सर यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे, मी त्यांना कधीही विसरू शकत नाही, अशी कृतज्ञता व्यक्त करीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त केली.
ठळक मुद्देविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या जीवनात पन्नालाल सरांचे महत्त्वाचे योगदान