लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र आज धूसर होत चालले आहे. शाळेच्या दुरवस्थेवर, सोयीसुविधांवर ताशेरे ओढले जात आहे. गावागावात झालेल्या कॉन्व्हेंटमुळे जि.प.च्या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. जि.प. शाळांचे विदारक चित्र समोर असताना, असेही काही शिक्षक आहेत ज्यांनी जि.प.च्या अशा काही शाळांचे रूप बदलविले आहे. याच शिक्षकांमध्ये आहे जि.प. प्राथमिक शाळा सुकडीचे मुख्याध्यापक राजकुमार क्षीरसागर.१९९५ मध्ये क्षीरसागर सरांची रामटेक पंचायत समितीअंतर्गत लोधा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. लोधा हे गाव आदिवासीबहुल. शाळा होती, मात्र मुलांना शिक्षणाचा गंध नव्हता. सोयीसुविधांचीही पुरती दुरवस्था होती. अशात शाळा चालविणे आणि ती टिकविणे क्षीरसागर यांच्यापुढे आव्हान होते. मात्र ध्यास होता, चांगले विद्यार्थी घडविण्याचा. ही परिस्थिती बदलण्यासाठी ते गावातच निवासाला गेले. मुलांना शाळेची ओढ लागावी म्हणून शाळेचा परिसर नीटनेटका करण्यासाठी स्वत: बाग लावली. पुढे ती बाग काढून त्याचे रूपांतर शेतीत केले. या शिक्षकाने शाळा आणि घर एकच केले होते. संपूर्ण वेळ ते शाळेत द्यायचे. सकाळी ७ पासून रात्री १० पर्यंत शाळा सुरू ठेवायचे. त्यांनी आपले कुटुंबसुद्धा गावातच वास्तव्यास नेले. मुलांनाही आपल्याच शाळेत दाखल करून घेतले. त्यामुळे संपूर्ण लक्ष त्यांचे शाळेत होते. शेतीतून भाजीपाला ते घ्यायचे. ते विकून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याची खरेदी करायचे. शाळा संपल्यानंतर रात्री १० पर्यंत शाळा सुरू ठेवून, मुलांना येणाऱ्या अडचणी सोडवायचे.गावातील ग्रामस्थांनाही त्यांनी आपलेसे केले होते. गावातील प्रत्येक घराशी त्यांचा संपर्क होता. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून वेगवेगळे उपक्रम ते राबवायचे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करायची. त्यावेळी असणारे कृष्णराव लांजेवार या मुख्याध्यापकांनी त्यांना चांगले सहकार्य केले. अशा छोट्याशा गावातील २६ विद्यार्थ्यांचा पट त्यांनी १७२ वर नेला. इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक विद्यार्थी घडविण्यात त्यांना यश आले. २०११ मध्ये त्यांची बदली झाली. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांच्या बदलीला विरोध केला. मात्र गावकऱ्यांना समजवून ते पुन्हा नव्या शाळेत रुजू झाले.सध्या ते सुकडी येथील जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. राजकुमार क्षीरसागर जेव्हा सुकडीच्या शाळेत आले तेव्हा शाळेचा पट ७५ होता. येथेही त्यांनी अध्यापनाचा तोच फार्म्युला वापरला. आज त्या शाळांचा पट १९७ पर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे येथेही कॉन्व्हेंटचे जाळे आहे. मात्र शिक्षणाप्रती त्यांच्यात असलेल्या सेवाभावामुळे राजकुमार क्षीरसागर हे खरंच आदर्श शिक्षक ठरताहेत. पण एक विशेष या शिक्षकाला कधीच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. कारण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे लागतात. पण त्यांनी स्वत:चे गुणगाण करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.
लोधा हे गाव खरंच सोयी सुविधेपासून दूर होते. गावात बससुद्धा दिवसभरातून एकदाच यायची. माझ्या कुटुंबाला मी या गावात वास्तव्यास आणले, याची थोडी खंत होती. पण माझ्या हातून घडलेले या गावातील विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर पाहून समाधान होत आहे आणि हीच माझ्या शिक्षण सेवेची पावती आहे.- राजकुमार क्षीरसागर, शिक्षक, जि.प.