लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीचा सगळीकडे हाहाकार माजला असून, दररोज मृत्यूची संख्या वाढत असून त्याला शिक्षकही अपवाद नाही. आतापर्यंत अनेक शिक्षक मृत्यूमुखी झाले असून अनेक अजूनही रुग्णालयात भरती आहेत. काही शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यही मृत्यूशी सामना करीत आहेत. अशा विदारक परिस्थितीत पैशाची नितांत गरज असताना त्यांच्याच भविष्य निर्वाह निधीची रक्कमही मिळत नसल्याची ओरड शिक्षकांची आहे. हक्काचा पैसा गरजेच्या वेळी मिळत नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दर महिन्याला नागपूरच्या तीन पे युनिटमधून अंदाजे ६० ते ७० भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव मंजूर होतात. पण १ एप्रिलपासून एकही भविष्य निर्वाह निधीच्या प्रस्तावाचे बीडीएस जनरेट होत नसल्यामुळे एप्रिल महिन्यात एकही प्रस्ताव निकाली निघाला नाही. शिक्षकांचा त्यांचा वर्षानुवर्षे जमा केलेला पैसा आज त्यांनाच शासनाच्या धोरणामुळे मिळत नाही, हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहे. आज बऱ्याच शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पैशाची नितांत गरज आहे. शासनाचा वित्त विभाग त्यांचाच पैसा त्यांना देण्यात भविष्य निर्वाह निधीची टॅब लॉक करून आणखी अडचणी वाढवीत आहेत. त्यामुळे आमचाच पैसा आम्हाला आज मिळत नाही, अशी अनेक शिक्षकांची ओरड सुरू झाली आहे.
- अनेक शिक्षक रुग्णालयात कोरोनामुळे भरती असून उपचारासाठी पैशाची नितांत गरज आहे. अशा बिकट परिस्थितीत वित्त विभागाने टॅब लॉक केल्याने शिक्षकांची जीपीएफची रक्कम जर त्यांना मिळत नसेल, तर यापेक्षा आणखी काय दुर्दैव? शासनाने तात्काळ टॅब ओपन करून शिक्षकांच्या हक्काचा पैसा त्यांना द्यावा.
अनिल शिवणकर, पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी