लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी जिल्ह्यातील समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी शिक्षकांची मागणी होती. यावेळी शिक्षकांनी विकल्प पत्र भरून देण्यावरही आक्षेप घेतला.शिक्षक संघटनांच्या मते विभाग स्तरावर समाजायोजनाची प्रक्रिया संच मान्यता २०१८-१९ न करता २०१७-१८ च्या संचमान्यतेच्या आधारावर समायोजनाची प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे जिल्ह्यात रिक्त जागा असतानाही, जिल्ह्याबाहेर शिक्षकांना जाण्याचा धोका निर्माण झाला. अनेक शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेत, संवर्गात तसेच नियुक्ती दिनांकात चुका असतानाही दुरुस्तीसाठी वाजवी संधी देण्यात आली नाही, यावर संघटनेने आक्षेप घेऊन, शिक्षक उपसंचालकांचा घेराव केला.काही संघटनांनी आक्षेप घेतला की, जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जि.प.च्या शाळांमध्ये करण्याचे शासनाचे आदेश आहे. नागपूर जिल्ह्यात शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. पण चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये समायोजनाची प्रक्रिया जिल्हानिहाय संपूर्ण पार पडली नाही. तरीही विभागीय समायोजनासाठी शिक्षकांना बोलाविण्यात आले. शिक्षकांचा आक्षेप होता की, दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त शिक्षकांची यादी व्हॉट्सअॅपवर प्रकाशित करण्यात आली. ही यादी बघून शिक्षक समायोजन स्थळी पोहचले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या समायोजन प्रक्रियेत समायोजन स्थळावर शिक्षकांसाठी साध्या पाण्याची सुद्धा सोय करण्यात आली नव्हती. महिला शिक्षिका लहान मुलांना घेऊन प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. समायोजन प्रक्रियेत अपंगांना प्राध्यान्य असल्याने, नियमानुसार विभागीय प्रक्रियेत अपंग बसू शकत नाही, मात्र अपंग शिक्षकही प्रक्रियेत सहभागी झाले होते.विभागात ६५४ शिक्षक अतिरिक्तनागपूर विभागात खाजगी अनुदानित शाळेतील ६५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. तर रिक्त जागा ह्या २२७ आहे. यात वर्धा जिल्ह्यात ३७, भंडारा ५९, गोंदिया २९, नागपूर ६०, चंद्रपूर ४०, गडचिरोलीत २ जागा रिक्त आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिकेच्या शाळेतील रिक्त जागेवर समायोजन केल्यास अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी होऊन शिक्षकांचे जिल्ह्यातच समायोजन होईल.प्रक्रिया स्थगित करावीविभागीय समायोजनाच्या प्रक्रियेत अनेक त्रुटी असून, ही प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सुभाष गोतमारे, अजय भोयर, सुधीर वारकर, देवेंद्र हुलके, गोवर्धन भोंगाडे यांनी शिक्षक उपसंचालकाकडे केली.शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकारजिल्ह्यात जागा रिक्त असताना, त्या जागेवर शिक्षकांचे समायोजन न करता, त्यांना बाहेरगावी पाठवून शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार शिक्षण विभाग करीत आहे. समायोजनाची प्रक्रिया नियमबाह्य राबविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय सचिव बाळा आगलावे, आशिष मोहल्ले, सतीश दामोदरे, अजहर हुसैन, जयप्रकाश तवले, अनिल राऊत, उमेश डडमल यांनी केली.