नागपूर : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण व प्रौढ शिक्षण उपक्रमासंदर्भात आयोजित तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणाकडेशिक्षकांनी पाठ फिरवली. बहिष्कारामुळे बुधवारी सर्व १३ तालुक्यातील प्रशिक्षण वर्गात एकच शुकशुकाट होता.
नवभारत साक्षरता या केंद्रपुरस्कृत अभियानांतर्गत राज्यात मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांना निरक्षरांचा सर्वे करण्याचे काम देण्यात आले होते. सर्वेक्षणाचा वयोगट १५ ते ३५ व पुढचा असून तो सन २०११ च्या जनगणनेवर आधारीत आहे. शिवाय या सर्वेक्षणात बांधकाम मजूरांची माहिती संकलीत करायची आहे. त्यामुळे हे कार्य संपुर्णत: अशैक्षणिक स्वरूपाचे असल्याचा संघटनांचा आरोप आहे. त्यामुळे या कामावर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांकडून बहिष्कार टाकण्यात आला. दरम्यान या विरोधात काही संघटनांकडून आंदोलन ही करण्यात आले होते. संघटनांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनाकडून मात्र हे काम पुढे रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशातच बुधवारी या कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावर प्रत्येक केंद्रातून एक मुख्याध्यापक व एक शिक्षक यांचे तीन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र नवभारत कार्यक्रमावरच शिक्षक संघटनांचा बहिष्कार असल्याने सुरू झालेल्या प्रशिक्षणावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांकडून करण्यात आले होते, या आवाहनाला शिक्षकांनीउत्स्फुर्त प्रतिसाद दिला, बहिष्कार १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. तर या कार्यक्रमासंदर्भात यापुढे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणावर सुद्धा बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे.