काटोल : काटोल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात तालुक्यात रुग्णांची ऑक्सिजनसाठी होणारी भटकंती लक्षात घेता जि. प. शाळेच्या शिक्षकांनी योगदान करण्याचा संकल्प केला. यानुसार ‘काटोल विधानसभा जि. प. प्राथमिक शिक्षक आघाडी’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून काटोल आणि नरखेड तालुक्यातील जवळपास ३०० शिक्षकांनी सामाजिक दायित्वचा भाग ३.५ लाख रुपयांची वर्गणी ऑनलाइन पद्धतीने गोळा केली. या निधीतून काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात पाच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, फ्लो मीटरसह व दोन इन्व्हर्टर बॅटरी देण्यात आली. तसेच नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयाला १.५ लाख रुपयाची औषध देण्यात आली. हे सर्व साहित्य जि. प. शिक्षकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश डवरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर वाघमारे यांच्याकडे सुपूर्द केले.
--
सर्वसामान्य जनतेसाठी जि. प. शिक्षकांनी दाखविलेली सामाजिक दातृत्वाची कृती कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. यापुढेदेखील जमेल तशी मदत विविध स्तरातून मिळेल अशी अपेक्षा आहे.
- डॉ. दिनेश डावरे, वैद्यकीय अधीक्षक, काटोल