गुरू पाैर्णिमा विशेष
नागपूर : आम्ही नाेकरीवर लागेपर्यंत संविधान काय चीज आहे, हे माहीत नव्हते. आता कुठे ते कळायला लागले. संविधान काेणत्या जातीधर्माचे नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेपासूनच संविधानाची ओळख निर्माण हाेणे गरजेचे आहे. हा विचार मनात ठेवून त्याबद्दल जागृती करण्याचा ध्यास घेतलेले शिक्षक म्हणजे खुशाल कापसे.
कापसे यांच्या शिक्षकी सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पारशिवनी येथील १ ते ४ वर्गाच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांना पहिली नियुक्ती मिळाली. एका विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख हाेती. २००८ पासून शाळांमध्ये संविधान प्रास्ताविका वाचनाचा उपक्रम सुरू झाला. त्याला व्यापक रूप देण्याच्या विचारातून कापसे यांनी शाळेत संविधानावर आधारीत सामान्य ज्ञान स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा असे उपक्रम सुरू केले. संविधानाचा अभ्यास करावा, हा त्यामागचा उद्देश. त्यांच्या या उपक्रमाला ग्रामस्तरावर ओळख मिळाली. २०१४ मध्ये त्यांनी शाळेत संविधान स्तंभ उभारण्याचा संकल्प साेडला व गावकऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. शासनाची मदत न घेता लाेकसहभागातून २०१६ मध्ये हा स्तंभ उभा राहिला.
त्यांच्या कामाची दखल घेत स्थानिक महात्मा गांधी वाणिज्य महाविद्यालयाकडून तरुणांसाठी संविधानावर आधारीत काही उपक्रम घेण्याची विनंती कापसे यांना करण्यात आली. पारशिवनीच्या पाऊलवाट फाऊंडेशनच्या सहकार्याने त्यांनी तरुणांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा सुरू केली. ही स्पर्धा मागील ५ वर्षापासून पारशिवनीमध्ये अविरत चालली आहे. २०१८ मध्ये त्यांची बदली गरंडा येथील जिल्हा परिषद शाळेत झाली. या ठिकाणीही त्यांनी लाेकसहभागातून एक भव्य संविधान स्तंभ उभारला. पूर्वीसारखे उपक्रमही चाललेच आहेत. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत ज्या संविधानावर या देशाचा कारभार चालताे, त्याबद्दलची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये असावी व जागृत तरुण घडावे, यासाठी धडपडणाऱ्या या गुरुला सलाम.