लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २६ नाेव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मागे घेत ते १४ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यामुळे साेमवार(दि. १४)पासून शाळा सुरू हाेणार असल्याने शिक्षकांना पुन्हा ‘आरटीपीसीआर टेस्ट’ करावी लागत आहे. दुसरीकडे पाल्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांचे संमतीपत्र अनिवार्य करण्यात आल्याने, या संमतीपत्राला पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.
तालुक्यात इयत्ता नववी व दहावीचे एकूण ५,३४७ आणि अकरावी व बारावीचे ४,२४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ७६१ पालकांनी त्यांच्या नववी व दहावीच्या पाल्यांना तर २८५ पालकांनी त्यांच्या अकरावी व बारावीतील पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र दिले आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने नियाेजन करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २६ नाेव्हेंबरपूर्वी ‘आरटीपीसीआर टेस्ट’ करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर १८ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, या १८ दिवसामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या ‘आरटीपीसीआर टेस्ट’ आता कुचकामी ठरल्या आहेत. या ५२९ कर्मचाऱ्यांच्या नव्याने टेस्ट कराव्या लागत असल्याने शासनाचा त्यावरील खर्च व कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. वारंवार चाचण्या कराव्या लागत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
....
१२ कर्मचारी काेराेना संक्रमित
रामटेक तालुक्यात ४० माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ५२९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून, इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांची संख्या २२८ व इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षकांची संख्या १३४ आहे. यातील २०४ माध्यमिक व १०० उच्च माध्यमिक शिक्षकांनी त्यांची ‘आरटीपीसीआर टेस्ट’ केली असून, आठ शिक्षक व चार शिक्षकेतर कर्मचारी काेराेना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
...
सर्वच शिक्षकांना शाळेत जावे लागेल. त्यांना त्यांची ‘आरटीपीसीआर टेस्ट’ करणे अनिवार्य आहे. मागील चाचण्यांचा अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत जुन्या आराखड्यानुसार उपाययाेजना केल्या जातील.
- संगीता तभाने,
गटशिक्षणाधिकारी, रामटेक.