लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची परिस्थिती पाहता शिक्षण पुढे नेण्यासाठी देशभरात जे चांगले प्रयोग झाले त्यावर विचार केला पाहिजे. पुढे कोरोनाचे संकट असेच कायम राहिले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून टीव्हीद्वारे शिक्षण देण्याचा नवा पर्याय विचाराधीन आहे. शिक्षण विभागामार्फत यासंबंधीचे व्हिडिओ तयार करून उपलब्ध टीव्ही चॅनलच्या माध्यमातून दुपारच्या वेळेत हे शिक्षण दिले जाऊ शकते. यासंबंधीचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे सादर केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
नागपुरात बोलताना कडू म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी आहे. ही संधी साधून प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यास हरकत नाही. आधीच दीड वर्ष तसेच गेले आहे. आता पालक व विद्यार्थ्यांनीही या मानसिकतेतून बाहेर येणे आवश्यक आहे. आठ महिने नाही, तर किमान चार महिन्यांची शाळा करून मुलांना आवश्यक शिक्षण कसे देता येईल, यावर लक्ष देणे गरजेेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गासाठी आवश्यक असलेले पूरक शिक्षण मिळेल, एवढाच अभ्यासक्रम शिकविला जावा, असे नियोजन केले जाईल.
शाळा सुरू करण्यावर काही मंत्र्यांचा आक्षेप
शिक्षण विभागाने १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला होता. मात्र, टास्क फोर्स व काही मंत्र्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. शेवटी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो. तसेही जिल्हाधिकारी, सरपंच व स्थानिक पदाधिकारी यांनी निर्णय घ्यायचा आहे. आता मुख्यमंत्री पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील, असेही कडू यांनी स्पष्ट केले.