लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात देशभरातील शहरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. केंद्रीय पथक विदर्भाच्या दौऱ्यावर आले असून, १० जानेवारीनंतर पथक नागपूर शहराची अचानक पाहणी करणार आहे. पाहणीसाठी पथक आपल्या मर्जीनुसार शहरातील स्थळांना भेटी देणार असल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.केंद्रीय पथकाचा दौरा गुप्त स्वरूपाचा राहणार आहे. महापालिका प्रशासनाला माहिती न देता पथक अचानक शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी येणार आहे तसेच शहरातील कुठल्या स्थळाची पाहणी करावयाची, हे पथकच ठरविणार आहे. त्यामुळे पथकाच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी ४ हजार गुण निश्चित करण्यात आले होते. २०१९ मध्ये ही स्पर्धा ५ हजार गुणांची आहे. यात शहरातील नागरिकांचा अभिप्राय, सेवा पातळी, प्रत्यक्ष निरीक्षण व केंद्रीयकरण यासाठी प्रत्येकी १२५० गुण ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेबाबतचा डेटा ऑनलाईन अपलोड केला आहे. त्यानुसार पथक आपल्या मर्जीनुसार शहरातातील स्थळांची निवड करून पाहणी करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरात नागपूर १३७ व्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर शहराला प्रथम क्रमांक मिळाला होता. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत क्रमांक मिळाला नव्हता. परंतु ‘इनोव्हेशन अॅन्ड बेस्ट प्रॅक्टिस’ श्रेणीतील भारतातील सर्वोत्तम शहरात प्रथम स्थान मिळाले होते. स्पर्धेची तयारी केल्यानंतरही स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरला पहिल्या १० शहरात स्थान मिळाले नव्हते. याचा विचार करता यावेळी प्रशासनाने तयारी केली आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या सर्वेक्षणात नेमका कोणता अभिप्राय मिळतो, यावर क्रमांक ठरणार आहे.पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाची तयारीमहापालिका प्रशासनाने स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी घेण्यासाठी शहरभर स्वागत कमानी, होर्डिंग्ज आणि गॅस बलून्स लावले आहेत. मात्र मुख्य रस्त्यांसह वस्त्यांची अस्वच्छतेची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही. गेल्या वर्षी प्रशासनाने तयारी केल्यानंतरही स्वच्छता सर्वेक्षणात शहर माघारले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या दहाही झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना दुकानदार व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यात आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच दैनंदिन कचरा उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे.