नागपूर : आरटीईमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांकडून अनेक क्लृप्त्या केल्या जातात. एका पालकाने शाळेपासूनचे अंतर एक किलोमीटर आहे, हे दाखविण्यासाठी रिकाम्या प्लॉटला निवासस्थान दाखविले. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने शुक्रवारी विभागाच्या टीमने पालकाच्या त्या रिकाम्या प्लॉटवर जाऊन चौकशी केली.
आरटीई अॅक्शन कमिटीने आरटीईमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या आधारे आरटीई व्हेरीफिकेशन कमिटीचे अध्यक्ष व उपशिक्षणाधिकारी मदन बोरकर व शिक्षण विभागाच्या ज्योत्स्ना हरडे यांनी अनियमिततेची चौकशी करण्यासाठी टीम तयार केली. या टीमने आलेल्या तक्रारीचा ठिकाणी जाऊन आढावा घेतला. यात झालेली अनियमितता टीमच्या लक्षात आल्या. टीमने त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे. संबंधित पालकांच्या घरी सुद्धा टीम पोहचली. या टीममध्ये आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ, रिसोर्स पर्सन कंचन वानखेडे, शुभांगी फुटाणे, बंडू कुबडे, नानेश्वर लांडे, ज्योती अंबादे, आरती वासाडे, सचिन पांडे, दीपाली इंगळे, मोनु चोपडे उपस्थित होते. या प्रकरणात खोटी माहिती व बनावट कागदपत्र सादर करण्यावर कारवाई होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
- कमिटीला आढळलेल्या बाबी
१) प्लॉट क्रमांक ५५३ सेक्टर क्रमांक ३५ च्या पालकाचे घर टीनाचे आढळले. कागदपत्र जोडताना विजेचे बिल दिले.
२) प्लॉट क्रमांक २४७ व सेक्टर क्रमांक ३४ च्या पालकाचे दस्तावेज चुकीचे आढळले.
३) अर्ज करताना दिलेला पत्ता टीमला आढळला नाही.