संघश्रेष्ठींचे निर्देश: दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी तोडग्याचा शोध सुरूयोगेश पांडे नागपूरउन्हाळ््याच्या तोंडावर राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. संघाच्या तज्ज्ञ स्वयंसेवकांची एक ‘टीम’च यावर सखोल अभ्यास करत आहे. शिवाय यंदाच्या दुष्काळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध प्रकल्पदेखील राबविण्यात येणार असून संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून यावर देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघ मुख्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.राज्यात सातत्याने काही वर्षांपासून दुष्काळ पडतो आहे. यंदादेखील तशीच परिस्थिती असून पावसाच्या कमतरतेमुळे मराठवाडा तसेच विदर्भात पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर जलाशये आतापासूनच कोरडी पडायला सुरुवात झाली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी गावागावांमध्ये जाण्याचा संघातर्फे निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरत्या उपाययोजनांसाठी संघ आणि संघ परिवारातील विविध संघटनांनी नोव्हेंबर महिन्यापासूनच कंबर कसली आहे. मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शिवाय दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यांची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याने उन्हाळ््यात मराठवाड्यामध्ये ५० हून अधिक चारा छावण्यांच्या माध्यमातून पशूखाद्य पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.परंतु भविष्याचा विचार करून संघाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार दुष्काळी गावांचे तज्ज्ञांच्या ‘टीम’कडून सर्वेक्षण सुरू आहे. शिवाय येथील भूजल पातळी वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, पाण्याचा साठा कसा वाढेल व नवीन जलस्त्रोत कसे निर्माण करता येतील यावर या स्वयंसेवकांकडून अभ्यास सुरू आहे. शिवाय लहान बंधारे व शेततळी बांधणे, जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीविकरण यावरदेखील भर देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी संघाची धाव
By admin | Published: March 18, 2016 3:17 AM