समन्वय बैठकीत निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय समन्वय बैठक नागपुरात सुरू आहे. शनिवारी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी संघटनेच्या व्यापक विस्ताराचा संकल्प करण्यात आला. २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बैठकीत शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषत: युवकांना संघटनेत जोडण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यावर भर देण्यात आला. संघाची कोर कमिटीची बैठक रविवारी होण्याची शक्यता संघ सूत्रांनी वर्तविली आहे.
शुक्रवारी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय समन्वय बैठकीत देशातील परिस्थितीपासून तालीबानच्या उदयानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर गंभीर चर्चा झाली. रेशिमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात आयोजित या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सर्व सरकार्यवाह व संघाशी संबंधित संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भाजपाकडून पक्षाचे संघटन महासचिव बी.एल. संतोष यांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी संघटनेने वर्षभर केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. दुसऱ्या दिवशी प्रदीर्घ चर्चेचे सत्र चालले. सूत्रानुसार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या दरम्यान संघाच्या शताब्दी वर्षात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यावर जोर दिला. त्यांनी सांगितले की, संघाचे शताब्दी वर्ष २०२४ ते २५ दरम्यान साजरे करण्यात येणार आहे; परंतु याची तयारी आतापासून सुरू व्हायला हवी. या माध्यमातून संघटना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरही संघटनेच्या विस्तारासाठी आवश्यक पाऊल उचलले जातील.
- बॉक्स
किसान व मजदूर संघानेही मांडली आपली बाजू
बैठकीबाबत संघाने अतिशय गोपनीयता बाळगली. कोविड प्रोटोकॉलमुळे प्रसिद्धी माध्यमांनाही स्मृती भवनात प्रवेश देण्यात आला नाही. सूत्रांनुसार भारतीय किसान संघ व भारतीय मजदूर संघाने बैठकीत आपले म्हणणे मांडले. त्यांनी शेतकरी व कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठोस पाऊल उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय किसान संघाने आधारभूत किमतीबाबत केंद्र सरकारचा विरोध केला.
- बॉक्स
कोविडमुळे प्रलंबित राहिलेल्या कामांना मिळणार गती, पश्चिम बंगालवर चिंता
कोविड संकटामुळे संघाचे अनेक कार्य प्रलंबित राहिले. भूमी सुपोषण अभियानालाही अपेक्षित यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत संघटनेच्या कार्यांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच बैठक होईल. सूत्रांचे म्हणणे आहे की, या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर भडकलेल्या हिंसेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. तिथे स्वयंसेवकांच्या घरावर झालेले हल्ले ही गंभीर बाब असून, ही माहिती देशभरात पसरविण्यावर बैठकीत जोर देण्यात आला.