योगेश पांडे
नागपूर : एकीकडे देशभरात ‘स्किल एज्युकेशन’बाबत मोठमोठे दावे करण्यात येत असताना महाराष्ट्रात मात्र तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची पीछेहाट होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. २०१९-२० पासून दोनच वर्षांच्या आत ‘एआयसीटीई’च्या (ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) अंतर्गत येणारी राज्यातील थोडीथोडकी नव्हे तर, ३२ टक्के महाविद्यालये बंद झाली आहेत. मागील काही वर्षांत महाविद्यालयांचे अक्षरश: पीक आले होते. परंतु कोरोनामुळे शिक्षणसम्राटांच्या देखील मर्यादा उघड पडल्या. महाविद्यालये चालविणेच कठीण झाल्यामुळे त्यांना टाळेच लावण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.
‘एआयसीटीई’च्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. २०१९-२० साली महाराष्ट्रात ‘एआयसीटीई’ची मान्यता असलेली १ हजार ६०६ महाविद्यालये होती. २०२० साली कोरोनाचा शिरकाव झाला व त्याचा संपूर्ण शिक्षण प्रणालीला मोठा फटका बसला. २०२०-२१ मध्ये महाविद्यालयांची संख्या २५९ ने घटून १ हजार ३४७ वर आली. तर, २०२१-२२ मध्ये हीच संख्या १ हजार २१० इतकी झाली. दोनच वर्षांत ‘एआयसीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ३९६ ने घट झाली.
पदवी-पदविका महाविद्यालयांत सर्वाधिक घट
दोन वर्षांत पदविका अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत सर्वाधिक घट झाली. २०१९-२० साली ७९६ महाविद्यालये होती व दोनच वर्षांत ही संख्या ४९५ वर आली. ही घट ६०.८० टक्के इतकी आहे. तर, पदवी महाविद्यालयांत दोन वर्षांत ३६.९० टक्के इतकी घट झाली. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयात ०.८८ इतकीच घट झाली.
फार्मसी, अभियांत्रिकीला जास्त फटका
दोन वर्षांत राज्यातील ६६.६० टक्के फार्मसी महाविद्यालये बंद पडली. २०१९-२० मध्ये राज्यात ५५१ फार्मसी महाविद्यालये होती व २०२१-२२ मध्ये ही संख्या १८४ वर आली. अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांमध्ये दोन वर्षांत ४३ ने घट झाली व २०१९-२० च्या तुलनेत ही टक्केवारी ६.०४ टक्के इतकी होती.
व्यवस्थापन, एमसीए महाविद्यालयांत वाढ
एकीकडे इतर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत घट झाली असताना व्यवस्थापन व एमसीए अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या वाढली. २०१९-२० च्या तुलनेत राज्यात एमसीए महाविद्यालयांत १२.५ व व्यवस्थापन महाविद्यालयांत ८.७२ टक्क्यांनी वाढ झाली.