लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सोमवारी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळात तांत्रिक अडथळे आले व नियोजित वेळापत्रकानुसार १८ जानेवारीपासून महाविद्यालयात प्रवेशनिश्चिती कशी करणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला होता. अखेर विद्यापीठाने मंगळवारी प्रवेशनिश्चितीचे वेळापत्रकच बदलले. नवीन वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १९ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चिती करता येणार आहे.
पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यातील महाविद्यालयांची वाटप यादी १७ जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर होणार होती. मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वाटप यादीच पाहता आली नाही. १८ जानेवारीपासून कशाच्या आधारावर प्रवेशनिश्चिती करावी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. अखेर मंगळवारी सकाळी सर्वांना वाटप यादी दिसू लागली. मात्र लगेच प्रवेशनिश्चिती करणे शक्य नसल्याने विद्यापीठानेदेखील वेळापत्रकात बदल करणारे परिपत्रक काढले. त्यानुसार पदव्युत्तर विभाग किंवा संलग्नित महाविद्यालयात १९ जानेवारीपासून प्रवेशनिश्चिती करता येऊ शकेल.